वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार आज, सोमवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी करणार आहे. प्रदीर्घ काळापासून देशभरातील कोटय़वधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रविवारी याविषयीची माहिती जारी केली. पंतप्रधान मोदी सोमवारी कर्नाटक दौऱयावर असून बेळगाव येथील कार्यक्रमातून ते शेतकऱयांना 2,000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित शेतकऱयांना एसएमएस पाठवून कार्यक्रमात व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. देशातील गरीब शेतकऱयांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेतून शेतकरी शेतीशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे करू शकतात.