तरुणभारत ऑनलाइन
सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक घरांमध्ये पोह्यांना पसंती दिली जाते. वजन कमी करण्यासाठी देखील नियमितपणे पोहे खाणं फायदेशीर ठरतं. यामध्ये कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पोहे पचण्यासाठी अत्यंत हलके असतात. दडपे पोहे, तर्री पोहे, कांदे पोहे, इंदोरी पोहे असे पोह्यांपासून अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे आणि स्वादिष्ट पोह्याचे कटलेट कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
साहित्य :
दोन वाट्या भिजवलेले पोहे,तीन उकडलेले बटाटे, एक बारीक चिरलेला कांदा, एक चमचा चाट मसाला, १ चमचा हळद, १-१/२ चमचा लाल मिरची पावडर,बारीक चिरलेलीकोथिंबीर ,आला-लसूण पेस्ट, अर्धा लिंबू, मीठ चवीनुसार
कव्हरसाठी : एक वाटी तांदूळ पीठ, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, ब्रेड क्रम्ब्स
कृती:
एका भांड्यात उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्या. त्यात भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला कांदा, एक टीस्पून चाट मसाला, एक चमचा हळद, १-१/२ चमचा लाल मिरची पावडर, आला-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. तांदूळ पीठ, कॉर्नफ्लोअर आणि मीठ एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी. वरील मिश्रणाचे चपट्या किंवा गोल आकाराचे गोळे करून घ्यावेत.यानंतर तांदूळ आणि कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून नंतर ते ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवावे. नंतर तेलामध्ये गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले कटलेट सॉस किंवा पुदिना चटणी बरोबर गरमागरम सर्व्ह करावं.