उचगाव फाटा स्वागत कमानप्रकरणी पोलीस उपायुक्तांनी ग्रामस्थांना दिली माहिती
वार्ताहर / उचगाव
उचगाव फाटय़ावर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानप्रकरणी उचगावमधील सात जणांविरुद्ध पोलीस खात्याकडून नोटीस बजाविण्यात आल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. याची शहानिशा करण्यासाठी म्हणून गुरुवारी या सात जणांपैकी चौघांनी पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांची भेट घेतली. यावेळी आम्ही नोटीस वगैरे काही दिली नाही. गावात शांतता राखण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय गणेशोत्सव झाल्यानंतर याबाबत सर्वांशी चर्चा करू, असे स्पष्टीकरण दिल्याची माहिती या चौघांनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील उचगाव फाटय़ावर मळेकरणी देवस्थान व उचगाव ग्राम पंचायतकडून सहर्ष स्वागत अशा आशयाचा मजकूर असलेली मराठी आणि कन्नड दोन्ही भाषांमधील कमान उभारण्यात आली आहे. मराठी अक्षरे मोठी आणि कन्नड अक्षरे लहान असल्याचे निमित्त काढून काही संघटनांनी मराठी अक्षरेच काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर स्वागत कमानीवरील मराठी अक्षरे लहान करावीत, कन्नड अक्षरे मोठी करावीत, असा जिल्हा प्रशासनाने आदेश दिला. मात्र ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांची ग्राम पंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी मराठी अक्षरे लहान करण्यास गावकऱयांचा विरोध असून गावकऱयांची बैठक घेऊन सूचना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने 21 जुलैला ग्राम पंचायत आणि गावकऱयांची बैठक बोलावली होती. पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मराठी भाषिकांनी आपली मते परखडपणे मांडली होती.
ग्रामस्थांनी कन्नड अक्षरे 60 टक्के जागेत आणि मराठी अक्षरे 40 टक्के जागेत लिहिण्यास नकार दिला. मात्र यानंतर पोलीस खात्याने गावातील सात जणांविरुद्ध नोटीस बजावल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. याची शहानिशा करण्यासाठी गुरुवार दि. 18 रोजी लक्ष्मण सतबा होनगेकर, बाळासाहेब देसाई, लक्ष्मण लाळगे व समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंटकर यांनी पोलीस उपायुक्त गडादी यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी रविंद्र गडादी यांनी सांगितले की, नोटीस तयार करण्यात आली आहे. मात्र ती कोणालाही दिलेली नाही. गावात शांतता राखावी, यासाठी म्हणून आम्ही उपाययोजना करत आहोत. गणेश चतुर्थीनंतर यासंदर्भात व्यापक बैठक घेऊन विचार विनिमय केला जाईल, अशी माहिती रविंद्र गडादी यांनी भेटावयास गेलेल्या उचगाव ग्रामस्थांना दिली आहे.