विधी सेमिस्टर 6 व 10 च्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर 26 जुलैचा झालेला पेपर रद्दबातल; गैरहजर विद्यार्थ्यांची पुन्हा पुर्नपरीक्षा होणार नाही
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विधी अभ्यासक्रमाचा 26 जुलै रोजी ‘इंटिलेक्चुल प्रॉपर्टी राईटस्’ हा पेपर झाला होता. या पेपरला पाच प्रश्न चुकीचे आहेत, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे हा पेपर तांत्रिक आणि अपरिहार्य कारणामुळे रद्दबातल करून पुन्हा 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत नव्याने होणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत तीन वर्षाच्या विधी अभ्यासक्रमातील सेमिस्टर सहा व पाच वर्षाच्या विधी अभ्यासक्रमातील सेमिस्टर दहाचा 26 जुलै रोजी ‘ इंटिलेक्चुल प्रॉपर्टी राईटस्’ हा पेपर झाला होता. या पेपरमधील पाच प्रश्न चुकीचे आहेत, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यामुळे फुकटचे 10 गुण न देता पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय अधिकार मंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार ‘इंटिलेक्चुल प्रॉपर्टी राईटस्’ हा पेपर 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत होणार आहे. या परीक्षा सांगली, सातारा, कोल्हापूरमधील 7 परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. परीक्षा केंद्रांनी या परीक्षेच्या ओएमआर शीट तत्काळ सीलबंद करून कॅप विभागाव्दारे विद्यापीठाकडे पाठवायच्या आहेत. तसेच या पेपरला गैरहजर राहणाऱया विद्यार्थ्यांची पुन्हा पुर्नपरीक्षा घेण्यात येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.