Tarun Bharat

आंतरराज्य बससेवा केवळ सीमाहद्दीपर्यंतच

कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा ठप्पच : खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट : प्रवाशांचे होताहेत हाल

प्रतिनिधी / बेळगाव

करवेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन छेडून महाराष्ट्राच्या वाहनांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीदेखील आंतरराज्य बससेवा ठप्प झाली आहे. दरम्यान दोन्ही राज्यांच्या बसेस केवळ सीमाहद्दीपर्यंत धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आठवडाभरात सीमावादावरून दोनवेळा बससेवेवर परिणाम झाल्याने दोन्ही राज्यांच्या महामंडळांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान केल्यापासून आंतरराज्य बससेवा अडचणीत आली आहे. मागील आठवड्यात जत, अक्कलकोट, सोलापूरवर दावा केल्याने बससेवा ठप्प झाली होती. त्यापाठोपाठ हिरेबागेवाडीजवळील राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करून महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांची तोडफोड केली होती. दरम्यान, खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने कर्नाटकात धावणाऱ्या सर्व बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच पोलिसांच्या सूचनेनुसार बेळगाव आगारातून महाराष्ट्रात धावणाऱ्या बसदेखील बंद करण्यात आल्या. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विभागीय नियंत्रक पी. वाय. नायक यांनी वाद निवळल्यानंतर गुरुवारी बससेवा पूर्ववत होईल, अशी अशा व्यक्त केली होती. मात्र गुरुवारपर्यंत कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्पच होती.

महाराष्ट्राच्या विविध भागातून कर्नाटकात धावणाऱ्या 660 बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंतरराज्य प्रवास अडचणीचा बनला आहे. तसेच महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर व इतर ठिकाणच्या कर्नाटकच्या बसना काळे फासण्यात आले होते. त्यामुळे बेळगावातून महाराष्ट्रात धावणाऱ्या 300 हून अधिक बस ठप्प झाल्या आहेत.

एका बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेसच्या माध्यमातून मिळते. मात्र सातत्याने आंतरराज्य बससेवा विस्कळीत होत असल्याने महसुलावर परिणाम होत आहे. कोरोना संकटानंतर आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सातत्याने काही ना काही अडचणी येत असल्याने अधिक उत्पन्नापासून बेळगाव विभागाला दूर रहावे लागत आहे.

बेळगावातून निपाणीपर्यंत धावताहेत बस

बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून केवळ कर्नाटक हद्दीच्या निपाणीपर्यंत बस धावत आहेत. महाराष्ट्रात जायचे असल्यास कर्नाटकच्या बसने निपाणीपर्यंत जाऊन तेथून पुढे खासगी वाहनाने कोल्हापूर गाठावे लागत आहे. त्यामुळे या प्रवासात प्रवाशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या संधीचा फायदा घेत काही खासगी वाहनधारक प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत.

कोकणातील बस

शिनोळी फाट्यापर्यंतच कोकणातील बस शिनोळी फाट्यापर्यंत धावत आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, मालवण आदी भागातील बस केवळ शिनोळी फाट्यापर्यंत येत आहेत. तेथून पुढे खासगी वाहनाने बेळगाव गाठावे लागत आहे.

Related Stories

अक्कतंगेरहाळला नगर पंचायतीचा दर्जा देण्यास ग्रामस्थांचा विरोध

mithun mane

मोफत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून केली बेळगावकरांची सेवा

Amit Kulkarni

वडगाव परिसरातून शुभम शेळके यांना पाठिंबा

Amit Kulkarni

सोळा दिवसांनंतरही क्वॉरंटाईन व्यक्तीची मुक्तता नाही

Patil_p

बॉडिफिट गराज – निरोगी व सुदृढ शरिरसंपदेचे दालन

Patil_p

रोटरी क्लब बेळगावतर्फे आरोग्य खात्याला 250 फूट सॅनिटायझर्स मशीन्सची देणगी

Patil_p