कोलकाता / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना दिल्लीच्या रोज अव्हेन्यू न्यायालयाने 30 मेपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण चिनी व्हिसा घोटाळय़ाशी संबंधित आहे. या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय एस. भास्कररामन यांना सीबीआयने अटक केली आहे. 17 मे रोजी छापा टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 263 चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयने गेल्या आठवडय़ात कार्ती चिदंबरम यांच्या 10 ठिकाणांवर छापे टाकले होते. ज्ये÷ नेते पी. चिदंबरम यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप होत होता. पंजाबमध्ये तळवंडी साबो पॉवर लिमिटेडचा प्रकल्प सुरू असताना नियम डावलून चिनी मजुरांना व्हिसा देण्यात आल्याचे हे प्रकरण आहे.