10 ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचा ‘सर्वोच्च’ आदेश
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात 10 ऑगस्ट पर्यंत कोणतीही अटक कारवाई करु नये, असा आदेश न्या. सूर्यकांत आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांनी दिला. या आदेशानंतर त्यांच्या विरोधात तक्रारी सादर झाल्या तर त्या तक्रारीसंदर्भातही त्यांना अटक केली जाऊ नये किंवा त्यांच्या विरोधात कोणतीही सक्तीची कारवाई होऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
इस्लामचे प्रेशित मोहम्मद यांच्या संदर्भात वक्तव्ये केल्यानंतर शर्मा यांच्या जीवेम् मारण्याच्या, तसेच बलात्काराच्याही धमक्या धर्मांधानी दिल्या होत्या. तसेच देशात काही शहरांमध्ये समाजकंटकांनी दंगली घडविण्याचा प्रयत्न करत हिंसाचारही माजविला होता. शर्मा यांच्याविरोधात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधील पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 9 तक्रारी केल्या गेल्या होत्या.
एकत्र सुनावणीची मागणी
आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात आपण तक्रारींना तोंड देण्यासाठी आणि तपासासाठी जाऊ शकत नाही. आपल्याविरोधातील सर्व प्रकरणे एकत्र करुन एका न्यायालयात सुनावणीसाठी द्यावीत अशी मागणी करणारी याचिका शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या याच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ती फेटाळली होती. तसेच त्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांनी कठोर तोंडी ताशेरे झाडले होते, जे नंतर विधितज्ञांच्या टीकेचा विषय झाले होते. न्यायालयाने शर्मा यांना उच्च न्यायालयात याचिका सादर करण्याचीही सूचना दिली होती.
10 ऑगस्टला विचार करणार
आपली फेटाळली गेलेली याचिका पुनरुज्जीवीत करुन तिच्यावर विचार करावा, असे आवेदनपत्र शर्मा यांच्यावतीने विधिज्ञ मनिंदरसिंग यांनी सादर केले. त्यावर मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने 10 ऑगस्टपर्यंत शर्म यांना अटक करवाईपासून संरक्षण देण्याचा निर्णय दिला आहे.
शर्मांच्या हत्येसाठी पाकिस्तान्याची घुसखोरी नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी भारतात घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 11 इंच लांबीचा एक सुराही जप्त करण्यात आला आहे. ही अटक सीमा सुरक्षा दलाच्या सतर्क सैनिकांनी केली. राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्हय़ाच्या सीमेवरच्या हिंदुमलकोट येथून हा पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसला असताना त्याला अटक करण्यात आली. त्याची सखोल चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून सुऱयाबरोबरच धार्मिक पुस्तके, नकाशा, कपडे आणि खाण्याची सामग्री जप्त करण्यात आली आहे.