विविध किताबासाठी होणार लढती


क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदान रविवार दि. 24 एप्रिल रोजी आनंदवाडी आखाडय़ात आयोजित करण्यात आले आहे.
या आखाडय़ात भारत वि. इराण, भारत वि. जॉर्जिया अशा आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आयोजन यावषी करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे कुस्त्यांना पूर्णविराम मिळाला होता. पण या वषी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेने आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान घेण्याच्या उद्देशाने मोठय़ा कुस्त्यांचे आयोजन केले आहे.
या मैदानात प्रमुख कुस्ती जस्सापट्टी व मोनू दिल्ली यांना पराभूत केलेला जॉर्जियाचा जॉर्जी व पंजाबचा भूपेंद्रसिंग अंजयाला (सिकंदर शेखला पराभूत केलेला) यांच्यात बेळगाव केसरी किताबासाठी लढत होणार आहे. दुसऱया क्रमांकाची लढत महान भारत केसरी कोल्हापूर गंगावेस तालमीचा सिकंदर शेख व पंजाब केसरी पंजाबचा परदीपसिंग (स्पेंडर) यांच्यात दर्शन केसरी किताबासाठी लढत होणार आहे. तिसऱया क्रमांकाची कुस्ती हरियाणा केसरी विशाल हरियाणा व कुरूंदवाडचा (महाराष्ट्र) अस्लम काझी यांचा पठ्ठा महारूद्र काळेल यांच्यात बेळगाव मल्ल सम्राट किताबासाठी लढत होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगेरी व आंतरराष्ट्रीय मल्ल इराणचा सीना यांच्यात होणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व महाराष्ट्र कुर्डुवाडीचा निकेतन पाटील यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक कुस्त्या होणार आहेत.