ईडीकडून मद्यधोरण घोटाळय़ाप्रकरणी प्रश्नांचा भडिमार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील गाजलेल्या मद्यधोरण घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांची प्रवर्तन निर्देशालयाच्या अधिकाऱयांनी अनेक तास चौकशी केली आहे. सध्या सिसोदिया या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्यांना तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे.
प्रवर्तन निर्देशालयाच्या (ईडी) अधिकाऱयांच्या एका दलाने मंगळवारीं सकाळी कारागृहात जाऊन त्यांची चौकशी केली. 26 फेब्रुवारीला त्यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते जवळपास 10 दिवस सीबीआय कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आता ईडीनेही त्यांची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे. आम आदमी पक्षाने ते निर्दोष असल्याचा दावा केला असून केंद्र सरकार राजकीय विरोधकांविरोधात सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
न्यायालयाची अनुमती
सिसोदिया यांची चौकशी करण्यासाठी प्रवर्तन निर्देशालयाने रीतसर न्यायालयाची अनुमती घेतली असून त्यानंतर चौकशीला प्रारंभ करण्यात आला. सिसोदिया यांच्यावर या तपास यंत्रणेकडून पीएमएल कायद्याच्या अनुच्छेद 19 अनुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे त्यांची सीबीआयही भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करीत आहे. सिसोदिया यांच्याविरोधात भक्कम पुरावा सापडल्यास त्यांच्यावर मनी लाँडरिंग विरोधीं कायद्याअंतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होऊन आम आदमी पक्षाची प्रतिष्ठाही धोक्यात येऊ शकते. सिसोदिया यांनी दिल्ली न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर केला असून त्यावर 10 मार्चला सुनावणी होणार आहे.
25 नोव्हेंबरलाच आरोपपत्र
या प्रकरणात सीबीआयने 25 नोव्हेंबर 2022 लाच आरोपपत्र सादर केले आहे. त्या आरोपपत्रात सिसोदिया यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले नव्हते. मात्र, नंतर इतर आरोपींची चौकशी करताना त्यांचे नाव प्रामुख्याने समोर आले. परिणामी, त्यांना अटक करण्यात आली. दिल्लीच्या राज्य सरकारने काही विशिष्ट मद्यव्यापाऱयांना अनुचित लाभ मिळावा म्हणून राज्याच्या मद्यधोरणात बदल केल्याचा आरोप आहे. तसेच या घोटाळय़ातून आम आदमी पक्षाने बेकायदेशीर कमाई केली असून या पैशाचा गैरवापर गोवा आणि गुजरात येथील विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केला, असाही आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात ठेवला आहे.