प्रतिनिधी / निपाणी
सीमाप्रश्नावरून मंगळवारी तणाव निर्माण झाल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून निपाणीतून महाराष्ट्रात होणारी बससेवा थांबविण्यात आली होती. बुधवारीही कोणताच तोडगा न निघाल्याने बससेवा बंद होती. गुऊवारी मात्र परिस्थिती पाहून कर्नाटक परिवहनने महाराष्ट्रात बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कर्नाटक परिवहनतर्फे महाराष्ट्रात होणारी बससेवा सुरू झाली. यामुळे प्रवासीवर्गाला दिलासा मिळाला. मात्र अजूनही महाराष्ट्राच्या बसेस कर्नाटकात आलेल्या नाहीत.
तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोन्ही राज्यांच्या परिवहन विभागांनी मंगळवारी दुपारनंतर बससेवा स्थगित केली होती. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे मंगळवारी प्रवासी तसेच कामगारवर्ग व विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. यानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये बोलणी झाल्यानंतर तणाव काहीसा निवळला. त्यामुळे गुऊवारी सकाळपासून निपाणी आगारामार्फत कोल्हापूर, पुणे, इचलकरंजी, गडहिंग्लज, हुपरी आदी प्रमुख मार्गांवर होणारी बससेवा सुरू झाली. त्यामुळे आंतरराज्य मार्गांवर दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इचलकरंजी, गडहिंग्लज, हुपरी येथे बसस्थानकापर्यंत निपाणी आगाराच्या बसेस जात आहेत. कोल्हापुरात मात्र बसस्थानकात न जाता शहराबाहेर तावडे हॉटेलपर्यंत बससेवा सुरू आहे. गुऊवारी निपाणी आगारातून कर्नाटकची महाराष्ट्रात बससेवा सुरू झाली असली तरी महाराष्ट्र परिवहनच्या बसेस मात्र दिवसभर निपाणीत आल्या नव्हत्या. निपाणी आगाराने येथे आंतरराज्य बस वाहतुकीला कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र तरीदेखील महाराष्ट्र परिवहनने बससेवा स्थगित ठेवली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र परिवहनचीही बससेवा सुरू होण्याची शक्मयता आहे.
दरम्यान महाराष्ट्राची बससेवा बंद राहिल्याने गुऊवारी आठवडी बाजारात दिवशी नजीकच्या कापशी खोरे तसेच मुरगुड, गारगोटी, राधानगरी भागातून नागरिकांची निपाणीत होणारी वर्दळ काहीशी थंडावल्याचे दिसून आले.