Tarun Bharat

आंतरराज्य बससेवा वारंवार विस्कळीत

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांना फटका : उत्पन्नावर परिणाम

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनानंतर सुरू झालेल्या बसव्यवस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बंद, आंदोलन आणि राजकीय वादग्रस्त विधानांमुळे बससेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न घसरताना दिसत आहे. आंतरराज्य बससेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने बेळगाव विभागाला याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः बेळगाव विभागातील बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे राजकीय वादग्रस्त विधानांचा फटका परिवहनला बसला आहे. बेळगाव आगारातून दररोज महाराष्ट्रात 300 हून अधिक बस धावतात. त्यामुळे बेळगाव विभागाच्या एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून मिळते. मात्र काही ना काही कारणास्तव कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प होत आहे. त्यामुळे परिवहनला अधिक उत्पन्नापासून वंचित रहावे लागत आहे.

प्रवाशांची मोठी गैरसोय

बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र राज्याला लागून असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र विविध कारणाने वारंवार आंतरराज्य बससेवा ठप्प होत असल्याने दोन्ही राज्यांच्या बस महामंडळांना तोटा सहन करावा लागत आहे. बेळगावातून मुंबई, पुणे, नाशिक, सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, रत्नागिरी, राजापूर, रेड्डी, चंदगड आदी भागात धावणाऱया दैनंदिन बससेवेवर याचा परिणाम होत आहे. दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

कोरोनाकाळात कर्नाटक-महाराष्ट्र आणि गोवा ही आंतरराज्य बससेवा बराच काळ बंद होती. त्यामुळे तिन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांना मोठा फटका बसला होता. कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. त्याचबरोबर बससेवादेखील सुरळीत सुरू झाली. मात्र काही ना काही कारणास्तव कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेवर परिणाम होत आहे. बेळगाव बसस्थानकातून दररोज 690 बस विविध मार्गांवर धावतात. शहर आणि ग्रामीण भागात 274 बस फेऱया मारतात. त्यामुळे उत्पन्न अधिक आहे.

बेळगाव विभागात एकूण सात आगारांचा समावेश आहे. त्यामध्ये बेळगावमधील चार तर रामदुर्ग, खानापूर आणि बैलहोंगल या तीन आगारांचा समावेश आहे. बेळगाव विभागात 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास काढतात. त्यामुळे उत्पन्न बऱयापैकी प्राप्त होते. मात्र बससेवेवर सातत्याने परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावरही परिणाम होत आहे.

सातत्याने बससेवा विस्कळीत होत असल्याने समस्या

बेळगाव विभागात बेळगाव येथील चार आगारांसह रामदुर्ग, खानापूर, बैलहोंगल आगारांचा समावेश आहे. बससेवा सध्या सुरळीत सुरू होती. महाराष्ट्रासह गोवा राज्यातदेखील बस धावत होत्या. मात्र सातत्याने बससेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे.

– के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)

Related Stories

मटका अड्डय़ावर धाड; 21 जणांना अटक

Tousif Mujawar

विनय कुलकर्णी यांची वैद्यकीय तपासणी

Amit Kulkarni

चैतन्यमय वातावरणात निघाली दौड

Amit Kulkarni

बेनकनहळ्ळी पीडीओंचा मनमानी कारभार थांबवा

Omkar B

कचरा टाकल्याप्रकरणी ट्रक ताब्यात, 15 हजार दंड वसूल

Patil_p

संघर्षवाद्यांना जातीपुरते सीमित करणे अयोग्य

Amit Kulkarni