‘गांजा’ चॉकलेटची 164 पाकिटे जप्त
हैदराबाद / वृत्तसंस्था
हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी एका आंतरराज्य अमली पदार्थ तस्कराच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईदरम्यान आरोपीकडून 31 किलो वजनाची गांजा चॉकलेटची 164 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. मोहम्मद जफर उर हक असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने बिहारमधील सीतामढी जिह्यातील पुपरी शहरातून अवैध माल आणला होता. सदर अमली पदार्थांच्या माध्यमातून गांजा चॉकलेट बनवून त्याने अवैधपणे विक्री सुरू केली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त राधा किशन यांनी दिली. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यासह आरोपीला पुढील तपासासाठी एसएचओ, आसिफ नगर पीएस, हैदराबाद यांच्याकडे सोपवले आहे.
हैदराबाद पोलिसांनी आरोपीकडून अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये चारमिनार गोल्ड मुनक्काची 62 पाकिटे आणि प्रत्येकी 14 किलो वजनाच्या 40 गांजा चॉकलेट्स पाकिटांचा समावेश आहे. तसेच इतर अमली पदार्थांची एकंदर 164 पाकिटे हस्तगत केली आहेत. अमली पदार्थ तस्कर मोहम्मद जफर हा दर दोन महिन्यांनी बिहारमध्ये जात गांजा चॉकलेट विकत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.