वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबाद न्यायालयाने नवे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण एका महिला न्यायाधीशाला धमकावण्याशी संबंधित आहे. या नव्या वॉरंटमुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, अटकेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इम्रान यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
यापूर्वी इम्रान खान यांच्याविरोधात 3 प्रकरणांमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यापैकी एका प्रकरणात त्यांना तुऊंगात जाण्यापासून दिलासा मिळाला आहे. इम्रानला अटक केल्यानंतर 29 मार्चला आमच्यासमोर हजर करा, असे निर्देश न्यायालयाने सोमवारी पोलिसांना दिले. गेल्यावषी 20 ऑगस्ट रोजी इम्रान यांनी आपल्याविरोधात आदेश देणाऱ्या जेबा चौधरी यांना न्यायालयाच्या आवारात धमकी दिली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. देशाच्या न्यायव्यवस्थेचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणी कितीही मोठा असो किंवा तो कोणत्याही पदावर असो, त्याने न्यायाधीशांना उघडपणे धमकावले तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे खडे बोलही न्यायमूर्तींनी सुनावले आहेत.