Tarun Bharat

समान नागरी कायद्याचे खासगी विधेयक सादर

विरोधी पक्षांचा संसदेत गदारोळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी राज्यसभेत एक खासगी विधेयक सादर करण्यात आले आहे. हे विधेयक सादर करण्याच्या बाजूने 63 खासदारांनी मतदान केले तर विरोधात केवळ 23 मते पडली. समान नागरी संहिता लागू करण्यासाठी एका राष्ट्रीय पाहणी आणि अन्वेषण आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी या विधेयकात करण्यात आली असून ते भाजपचे सदस्य किरोडीमन मीणा यांनी सादर केले. यावेळी विरोधी पक्षांनी मोठय़ा प्रमाणात गदारोळ केला.

समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक आदी पक्षांनी विधेयक सादर करण्यास जोरदार विरोध केला. भारतात विविध समाजांच्या विविध परंपरा आहेत. परिणामी सर्वांसाठी समान नागरी कायदा लागू केला जाऊ शकत नाही, असा दावा समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव यांनी केला. मुस्लीम आपल्या चुलत बहिणीशी लग्न करु शकतो. पण हिंदू तसे करु शकत नाही. त्यामुळे समान नागरी कायदा लागू करता येणार नाही, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पियुष गोयल यांचे समर्थन

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विधेयक सादर केले जाण्याच्या अधिकाराचे समर्थन केले. कोणत्याही सदस्याला अशा प्रकारचे खासगी विधेयक मांडण्याचा आणि त्या विषयाला वाचा फोडण्याचा अधिकार आहे. गदारोळ माजवून हा अधिकार दाबून टाकता येणार नाही, असे त्यांनी विरोधी पक्षांना निक्षून सांगितले.

आश्वासन पूर्ण करणार?

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते. या राज्यात भाजपचा विक्रमी बहुमताने विजय झाला आहे. त्यामुळे आता भाजप राष्ट्रीय स्तरावर समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्न करणार हे उघड आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या वचनपत्रात भाजपने समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते.

सर्व पक्षांनी संयुक्त प्रयत्न करावेत ः गडकरी

देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी संयुक्तरित्या प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या संबंधी त्यांची मते व्यक्त केली. एका पुरुषाने एका स्त्रीशी लग्न करणे हे नैसर्गिक आहे. पण जेव्हा एक पुरुष चार चार महिलांशी लग्न करतो तेव्हा ती कृती अनैसर्गिक असते. समान नागरी कायद्याची संकल्पना कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आपण सर्वांनी मिळून देशाचे संवर्धन करावयास हवे हीच माझी भूमिका आहे, असे प्रतिपादन त्यानी या कार्यक्रमात सहभागी होताना केले.

Related Stories

भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारला भीषण अपघात

datta jadhav

भारताचे ब्रिटनला चोख प्रत्युत्तर

Patil_p

ऑडिओ कॅसेटचा जनक हरपला

Patil_p

स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद

Patil_p

डॉक्टरांवर हल्ल्यांप्रकरणी एफआयआर नोंदवा

Patil_p

सागरी सुरक्षेच्या त्रिपक्षीय चर्चेसाठी अजित डोवाल श्रीलंकेत

datta jadhav