वार्ताहर /पालये
जुनसवाडा-मांद्रे (सातोस्करवाडा) येथील औदुंबर पंचायतन श्री दत्तात्रय मठ मंदिरामध्ये जिल्हा पंचायत निधीतून मोरजी जिल्हा पंचायत सदस्य तथा मोरजी गावचे माजी सरपंच सतीश शेटगावकर यांनी इनव्हर्टर प्रदान केला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास याचा मंदिराला उपयोग होणार आहे.
या सोहळय़ाप्रसंगी मठाधीपती प.पू. माणिकनाथ स्वामी ऊर्फ शंकर सातोस्कर, पार्वती शंकर सातोस्कर, स्थानिक पंचायतसदस्या चेतना पेडणेकर तसेच डिचोली गटविकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर, मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद शेटय़े मेणकुरकर, पालयेचे पंचायतसदस्य सागर तिळवे, नामवंत मूर्तिकार रमेश शेटमांद्रेकर, ‘तरुण भारत’चे उपसंपादक राजेश परब तसेच अन्य स्थानिकांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात सदानंद मेणकुरकर यांनी सतीश शेटगावकर यांच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले व त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.
सतीश शेटगावकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीचा उत्सव हा प्रकाशाचा मानला जातो. या अनुषंगाने हा सोहळा होत असल्याने आपणास समाधान वाटत आहे. जिल्हा पंचायत निधीतून अनेक कामे करण्याची इच्छा आहे, मात्र मर्यादित निधीमुळे याला मर्यादा येतात. या मतदारसंघात छोटी-मोठी कामे आपण केली आहेत. या मंदिराच्या हॉल उभारणीसाठीही आपले सहकार्य लाभेल, असे आश्वासन त्यांनी दिले. सरपंच कारकिर्दीत आपण राबविलेल्या विकासकामांचीही माहिती त्यांनी दिली. केवळ मोरजी क्षेत्रातच नव्हे, तर अन्य क्षेत्रातही विकासकामे राबविण्यास आपले प्रयत्न असतील. तसेच विकासकामांचे प्रस्ताव द्या ती कामे करण्यास आपण तत्पर असेन, असे आश्वासनही शेटगावकर यांनी दिले.
राजेश परब यांनी आपल्या भाषणात मंदिराच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांच्या समाजसेवी कार्याचीही स्तुती केली. प.पू, माणिकनाथ स्वामी व त्यांच्या पार्वती निःस्वार्थीपणे या मंदिराची सेवा बजावत असून त्यांच्या हातून हे कार्य उत्तरोतर घडावे यासाठी त्यांना दीर्घायुष्य चिंतीले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्रीकांत पेडणेकर यांनी केले व त्यांनीच शेवटी आभार मानले. श्रीकांत पेडणेकर यांनी गेली दहा वर्षे सुरू असलेल्या मंदिराच्या कार्याचा तसेच चालणाऱया उत्सवाची माहिती उपस्थितांना दिली. इनव्हर्टर प्रदान केल्याबद्दल सतीश शेटगावकर यांनाही त्यांना धन्यवाद दिले.