भाजप प्रवक्ते सावियो रोड्रिगीस यांचे मागणी : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना लिहिले पत्र
प्रतिनिधी /मडगाव
गोवा सरकारने कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी खासगी एजन्सीला काम देण्याबाबत निर्णय घेतलेल्या ‘नो टेंडरिंग प्रक्रिये’चा मुद्दा भाजपचे प्रवक्ते सावियो रोड्रिगीस यांनी उपस्थित केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ‘तांत्रिक समिती’ स्थापन करावी आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी आपली समंती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. जर या प्रकरणात तथ्य आढळून आल्यास कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना मंत्री मंडळातून काढून टाकावे अशी मागणी ही त्यांनी या पत्रातून केली आहे.
कला अकादमीच्या ‘निविदा प्रक्रिया नाही’ यावर प्रश्न उपस्थित करण्याचा आपला हेतू सरकार किंवा त्यांच्या मंत्र्यांवर टीका करण्याचा नाही तर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद असताना नामनिर्देशन प्रक्रियेची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया वगळण्यामागील कारण समजून घेणे हा आहे असे या पत्रात सावियो रोड्रिगीस यांनी नमूद केले आहे.
निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आमच्या सरकारला कामासाठी इतर कोणत्याही बोलीदाराशिवाय हे काम पसंतीच्या खाजगी एजन्सीला देण्याच्या पक्षपाती निर्णयाच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. या निर्णयामुळे ‘भ्रष्टाचार’ होऊ शकतो अशा संशयाची बीजे पेरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी तांत्रिक समितीने करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
कला अकादमीच्या तपासात दक्षता संचालनालयाने जे मुद्दे मांडले आहेत, त्यातून काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. ते प्रश्न पुढील प्रमाणे, सार्वजनिक बांधकाम खात्याने एका एजन्सीचे नाव सुचवले आहे. या एजन्सीने मुंबईत गोवा भवनचे काम केले आहे. हे काम अजूनही सुरू असल्याचे समजते. तसेच मंत्रिमंडळाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. एजन्सीचे नाव आणि कामाचा प्रकार इत्यादी तपशील न देता कामांची किंमत 49.50 कोटी रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.
दक्षता संचालनालयाने जे मुद्दे मांडले त्याचा अर्थ असा होईल की, कला अकादमीसह पीडब्ल्यूडी आणि कला आणि संस्कृती संचालनालय यांनी वित्त विभाग, मंत्री मंडळ आणि मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केलेली आहे. दक्षता संचालयाने आपल्या तपासात परिच्छेद क्रमांक 16 (5-सी) नमुद केल्या प्रमाणे, त्यात तथ्य असल्यास हे सूचित करते की, खाजगी एजन्सी किंवा पीडब्ल्यूडी दोघांनीही कामाच्या प्रत्येक आयटमचे अचूक गोषवारा आणि तपशील मोजमाप केलेले नाही.
Qभ्रष्ट व्यवहारांसाठी भ्रष्टाचार कायदा 1988 अंतर्गत गोवा सरकारने खाजगी एजन्सीच्या कामांसह पीडब्ल्यूडी आणि कला आणि संस्कृतीच्या संपूर्ण प्रक्रियेचे मूल्यांकन करण्यासाठी ’तांत्रिक समिती’ स्थापन केली आहे. या समिती मार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमी प्रकल्पाची तुलना शहाजहानने बांधलेल्या ‘ताज महाल’शी करणारे विधान केले. ज्यासाठी निविदा प्रक्रियेची आवश्यकता नव्हती. मंत्री गोविंद गावडे भारतीय लोकशाहीच्या आचारसंहितेची थट्टा करतात. भारत हे लोकशाही राष्ट्र आहे हे मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही मान्य करणारच. गोव्याची तुलना शहाजहानच्या कालखंडाशी करणे म्हणजे गोव्यातील जनतेला सांगणे आहे की सरकार हे ‘शासक’ आहे आणि लोक ‘प्रजा’ आहेत. आपल्या लोकशाहीत राजकीय नेते ‘जनतेचे सेवक’ असतात. मंत्र्याची विचारप्रक्रिया भारतीय लोकशाहीच्या तत्त्वांसाठी घातक आहे असे सावियो रोड्रिगीस यांनी म्हटले आहे.
भारतात राज्यकर्ते नाहीत आणि गुलामही नाहीत. आपल्या लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे. हा मुद्दा मांडण्यात मी माझ्या राष्ट्राला प्रथम, माझा पक्ष दुसरा आणि स्वतःला सर्वात शेवटी ठेवले आहे. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की, गोव्याचे मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही ‘तांत्रिक समिती’ स्थापन करण्यास आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यास आपली संमती देणे महत्त्वाचे आहे आणि आरोप खरे असल्यास ते संबधित मंत्र्याला मंत्रीमंडळातून काढून टाकावेत. गोव्याच्या हितासाठी तुम्ही योग्य ते काम कराल असा मला विश्वास आहे.