गोवा प्रदेश काँग्रेसची ‘कॅग’कडे निवेदनाद्वारे मागणी
पणजी : गेल्या अनेक वर्षांपासून पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे सुरू आहेत. या कामासाठी पूर्णपणे जनतेस वेठीस धरले जात असून, या कामामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. शिवाय ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा संशय असून, या कामाची चौकशी निपष्पपाती व पारदर्शी व्हावी, यासाठी या प्रकल्पाच्या कामाच्या चौकशीसाठी विशेष ऑडिट करावे, अशी जोरदार मागणी गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आली. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते एल्विस गोम्स, जनार्दन भंडारी, व्यास प्रभू चोडणेकर व कार्यकत्त्यांनी राज्याच्या महालेखापाल अधिकाऱ्यांना निवेदन दिले. वरिष्ठ महालेखापाल सुनील कुमार हे कार्यालयात उपस्थित नसल्याने कॉंग्रेस नेत्यांनी कॅगच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
एल्विस गोम्स म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांचे अंतर्गत लेखापरीक्षण (इंटरनल ऑडिट) झालेले नाही. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झालेल आहे, हे सिद्ध होते. गोव्यात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाचे ऑडिट करण्यासाठी पाटणा-बिहार येथील ऑडिटर मिथिलेश सिंग यांची नेमणूक करण्यात आली असून, बिहारचा ऑडिटर गोव्यातील कामाचे कसे ऑडिट करू शकतो? असा प्रश्नही गोम्स यांनी उपस्थित केला. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि., या कंपनीतर्फे सुरू असलेली कामे ही वादग्रस्त ठरत आहेत. या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची वाताहत झालेली आहे. या कामाची चौकशी होणे गरजेची असून, एकाच ठिकणी अनेकदा रस्ते खणण्याचे प्रकार घडत आहेत. या कामात मोठा घोटाळा झाल्याने राज्याच्या महालेखापालांनी 100 टक्के चौकशी करून विशेष ऑडिटद्वारे घोटाळा उघडीस आणावा, अशी आमची मागणी असल्याचे गोम्स व भंडारी यांनी सांगितले.
…तर न्यायालयात धाव घेऊ
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात कोट्यावधी ऊपयांचा घोटाळा झाला असून, या कामाची चौकशी पारदर्शी व्हावी, अशी आम्ही वारंवार मागणी करूनही सरकारकडून ठोस पाऊले उचललेली नाहीत. त्यामुळे महालेखापाल यांनी विशेष ऑडिटद्वारे 100 टक्के पारदर्शी चौकशी करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.