फरिदाबादमध्ये सुटकेसमध्ये सापडले मृतदेहाचे तुकडे, डीएनए चाचणी होणार
फरिदाबाद / वृत्तसंस्था
श्रद्धा हत्याकांडात शुक्रवारी आणखी एक ट्विस्ट आला. हरियाणातील फरिदाबादमध्ये एका सुटकेसमध्ये मृतदेहाचे अवयव सापडले. फरिदाबाद पोलिसांच्या माहितीनंतर श्रद्धा हत्येचा तपास करणारे दिल्ली पोलीस तेथे पोहोचले आहेत. शरीराचे हे अवयव श्रद्धाच्या हत्येशी संबंधित आहेत की नाही, हे ओळखण्यासाठी डीएनए चाचणी देखील केली जाणार आहे.
फरिदाबादमधील सुटकेसमध्ये सापडलेले शरीराचे अवयव श्रद्धाच्या हत्येशी संबंधित असू शकतात. हे मृतदेह सूरजकुंडच्या जंगलात सापडले असून, मृतदेहाचे अवयव जवळपास एक महिन्याचे असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा? याचा उलगडा होणार आहे. श्रद्धा हत्येच्या तपासात गुंतलेले दिल्ली पोलीस त्यांची डीएनए चाचणी करण्याची शक्यता गृहीत धरून येथे सापडलेल्या मृतदेहाचे काही नमुने वेगळे ठेवण्यात आले आहेत. तर काही नुमने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
श्रद्धा हत्येचा आरोपी आफताब अमीन पुनावाला याच्या फ्लॅटमधून 5 चाकू जप्त करण्यात आले आहेत. त्यांची लांबी 5 ते 6 इंच आहे. या चाकूंनी श्रद्धाचा मृतदेह कापला होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. आफताबने श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी एका धारदार शस्त्राचा वापर केला होता. मात्र, अजून ते शस्त्र तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाही.
पॉलीग्राफी चाचणीत 8 तासात 40 प्रश्न
आफताबची दुसऱया टप्प्यातील पॉलीग्राफ चाचणी गुरुवारी झाली. दिल्लीतील रोहिणी भागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये ही चाचणी सुमारे 8 तास चालली. यामध्ये आफताबला 40 प्रश्न विचारण्यात आले. आफताबला सर्व प्रश्न हिंदीत विचारण्यात आले, मात्र त्याने इंग्रजीत उत्तरे दिली. या चाचणीवेळी तो काहीसा आजारी दिसून आला. काही प्रश्नांची उत्तरे देताना तो शिंकत असल्याची नोंद करण्यात आली. त्याच्या शिंकण्यामुळे काहीवेळा आवाजही व्यवस्थित येत नव्हता.
भाईंदर खाडीत मोबाईलचा शोध
महाराष्ट्र आणि दिल्लीच्या पोलिसांनी आफताबचा मोबाईल महाराष्ट्रातील भाईंदरच्या खाडीत शोधण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम बंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आफताबला गेल्या महिन्यात वसई पोलिसांनी चौकशीसाठी घटनास्थळी आणले होते. यावेळी त्याने आपल्या दोन मोबाईलपैकी एक मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याची जागा तपास यंत्रणांना दाखवली होती.