Tarun Bharat

‘त्या’ आसामी संशयितांच्या ‘बांगलादेश कनेक्शन’चा तपास

सत्र न्यायालयाने फेटाळले संशयितांचे जामीन अर्ज : वेर्णा येथील मंदिराजवळ लघुशंका केल्याने वाद

प्रतिनिधी /मडगाव

वेर्णा येथील प्रसिद्ध मंदिराजवळ एका व्यक्तीने उघडय़ावर लघुशंका केल्याच्या संशयावरुन जाब विचारल्यानंतर दोन गटांत झालेल्या मारहाणीत एकटा अत्यंत गंभीर अवस्थेत सरकारी इस्पितळात आहे, तर अटक करण्यात आलेल्या आसामी संशयित आरोपींचे जामीन अर्ज सत्र न्यायालयाने काल मंगळवारी फेटाळून लावले आहेत. संशयित आपण आसामचे असल्याचे सांगत असले तरी त्यांचे बांगलादेशी कनेक्शन आहे काय, याचा तपास करण्यात येत आहे, असे पेलिसांनी न्यायालयास सांगितले आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट यांच्या न्यायालयाने हे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. वेर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस प्रकरणाचा तपास करीत आहेत. जबर मारहाण करुन एकाहून अधिक जणांना गंभीररित्या जखमी केल्याच्या आरोपावरुन वेर्णा पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 143, 144, 147, 148, 307, 506(2)  कलमाखाली गुन्हा (क्रमांक 135/2022) नोंद करण्यात आला असल्याचे न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे.

संशयित आरोपी आसामचे की बांगलादेशी?

मूळ आसाम राज्यातील व सध्या वेर्णा परिसरात राहणारे संशयित आरोपी तुजाम्मेल हक (26), रफीक हक (22), रुपचंद अली (28), अब्दुल इस्लाम (23), अब्दुल नूर (25), अब्दुल हलीम (26), झकीर हुसैन (28) या संशयित आरोपींनी जामिनासाठी अर्ज केले होते. आसामपासून बांगलादेश जवळ असल्याने त्यांची पार्श्वभूमी तपासायची असल्याने पोलिसांनी जामीन देण्यास विरोध केल्यानंतर न्यायालयाने संशयितांचे अर्ज फेटाळाले.

लोखंडी सळय़ा, दांडे घेऊन जमाव

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणारा विवेक कुमार बिंद हा या प्रकरणातील तक्रारदार आहे.  8 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्रीनंतर (00.15 वाजता) हल्ल्याची ही घटना घडली होती. वरील संशयितांपैकी एकाने  इतरांना एकत्र केले, बेकायदेशीररित्या जमाव केला. या जमावाच्या हाती लोखंडी सळय़ा, दांडे होते.

जबर मारहाण करुन डोळाही फोडला

या हल्लेखोरांनी विवेककुमार बिंद व त्याच्या खोलीत राहणारे रवीकुमार, शिवनाथ रामपती, लक्ष्मण प्रसाद, कृष्णकुमार व राम़ाश्री यांना बेदम मारहाण केली आणि शिवनाथ रामपती याचा डावा डोळा फोडण्यात आला.

घटनेच्या रात्रीच सातजणांना अटक

वेर्णा पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनाला असेही आणून दिले की या घटनेनंतर पोलिसांनी त्याच रात्री 8.42 वाजण्याच्या सुमारास बाबुल हक, हरेझ खान, अब्दुल हलीम, अहदुल इस्लाम, अब्दुल नूर, फुल्सन खान व सोरुरुद्दीन यांना अटक केली. रामपती याच्यावर करण्यात आलेला प्राणघातक हल्ला एवढा गंभीर होता की रामपती वाचणार नाही, अशी पोलिसांना खात्री झाली होती. म्हणून सासष्टीच्या मामलेदारासमोर त्याची ‘मृत्यूपुर्व जबानी’ घेण्यात आली होती. मात्र, योगायोगाने रामपती वाचला असल्याचे वेर्णा पोलिसानी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले.

रफीकुल नामक व्यक्ती हल्ल्याला जबाबदार

 या मृत्यूपूर्व जबानीत गंभीररित्या जखमी असलेल्या रामपतीने अनेक हल्लेखोरांची नावे सांगितलेली आहेत. आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे रफीकुल जबाबदार असल्याचे रामपती यांनी सांगितले असल्याचे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात म्हटले आहे. म्हणून या एकंदर पूर्वनियोजित हल्ल्याच्या प्रकरणात सकृतदर्शनी पुरावा असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले आहे.

 जामीन दिल्यास पीडिताच्या जीवाला धोका

संशयित आरोपी वेर्णा औद्योगिक वसाहतीपासून जरा लांब राहणारे असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलेले असले तरी न्यायालयाला असे दिसून आले की पीडित व संशयित आरोपी हे सर्वजण वेर्णा औद्योगिक वसाहतीतच काम करणारे आहेत. याक्षणी त्यांना जामिनावर सोडणे म्हणजे पीडिताच्या जीवाला आणखी धोका तयार करणे होय किंवा आणखी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

संशयित आरोपीच पीडिताचे वरिष्ठ अधिकारी

या प्रकरणातील काही संशयित आरोपी हेच पीडित काम करत असलेल्या कारखान्यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत, असेही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देण्यात आले. एकंदर प्रकरण पाहता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी तसेच संशयित आरोपींची पार्श्वभूमी शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणेला पुरेसा अवघी देणे क्रमप्राप्त ठरत आहे आणि म्हणून अर्जदारांचे जामिनासाठीचे अर्ज फेटाळून लावण्यात येत असल्याचे न्या. बॉस्को जॉर्ज यांनी म्हटले आहे.

संशयित आसामचे सांगत असल्याने पार्श्वभूमी तपासणार

सरकारी वकील गावकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला असे आणून दिले की या प्रकरणातील सर्व संशयित आरोपी हे आसाम राज्यातील आहेत. या संशयितांची पार्श्वभूमी तपासायची आहे. आसाम राज्यालगत बांगलादेश आहे. बांगलादेशमधून अनेकजण बेकायदेशीररित्या भारतात घुसलेले आहेत. म्हणून या प्रकरणातील हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासल्याशिवाय त्यांना जामिनावर सोडणे उचित होणार नाही. शिवाय या प्रकरणाचा तपास अत्यंत प्राथमिक स्तरावर असल्याचे सरकारी वकील गावकर यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

Related Stories

सुदेश भिंगी यांना इन्स्टीटय़ुट मिनेझिस ब्रागांझाचे सदस्यत्व

Amit Kulkarni

भरती रेषा निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू : काब्राल

Omkar B

दहावी-बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा ऑफलाइन पद्धतीने

Amit Kulkarni

दिलीप परुळेकरांचे बंड झाले थंड!

Amit Kulkarni

राज्यात कोसळल्या पावसाच्या सरी

Amit Kulkarni

खाणींच्या याचिकेवर 13 रोजी सुनावणी

Amit Kulkarni