वायएसआर काँग्रेसचे खासदार अडचणीत
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आंध्रप्रदेशच्या कडप्पा येथील वायएसआर काँग्रेसचे खासदार वाय.एस. अविनाश रेड्डी यांची राज्याचे माजी मंत्री वाय.एस. विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी सीबीआयने चौकशी केली आहे. चालू वर्षात अविनाश रेड्डी यांची सीबीआयकडून पाचव्यांदा चौकशी करण्यात आली आहे.
अविनाश रेड्डी यांना 25 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचा निर्देश तेलंगणा उच्च न्यायालयाने सीबीआयला मंगळवारी दिला आहे. परंतु उच्च न्यायालयाने संबंधित तारखेपर्यंत विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी अविनाश यांना दररोज सीबीआयसमोर हजर राहण्याचा निर्देश दिला आहे.
न्यायालयाने सीबीआयला एक प्रश्नावली देण्याचा निर्देश दिला आहे. याचिकाकर्त्याच्या चौकशीला ऑडिओ-व्हिडिओ स्वरुपात रिकॉर्ड करण्यास उच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात 25 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून त्याचदिवशी अंतरिम जामीन अर्जावर अंतिम आदेश दिला जाणार आहे.
अविनाश रेड्डी यांचे पिता आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचे काका एस. भास्कर रेड्डी यांना विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने 16 एप्रिल रोजी अटक केली आहे. विवेकानंद रेड्डी हे आरोपी भास्कर रेड्डी यांचे सख्खे भाऊ होते.