प्रतिनिधी/ मडगाव
आंतरराज्य बनावट नोटा प्रकरणी अटक केलेल्या गोव्यातील सर्व चारही संशयित आरोपींची कर्नाटक पोलिसांकडून सखोल चौकशी चालू असल्याची माहिती सूत्रानी दिली. दक्षिण गोव्यातील प्रवीण नायर (46), लॉयड लॉरेन्स स्टीव्हस (29), लार्सन सिल्वा (26) आणि प्रणय फर्नाडिस अशी संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणातील कोडीबाग-कारवार परिसरातील मुख्य संशयित आरोपी फरारी असून या घटनेच्या 48 तासानंतरही हा संशयित पोलिसांना वाकुल्या दाखविण्यात यशस्वी झाला, असल्याची माहिती सूत्रानी दिली.
बेळगाव जिल्हय़ात बनावट नोटांचा सुळसुळाट बराच वाढल्याने कर्नाटक पोलीस सावध झाले होते. कारवार येथील एका हॉटेलजवळ जुन्या नोटा बदलून देण्यात येणार असल्याची खबर प्राप्त झाली होती. साध्या वेषातील पोलीस तेथे दबा धरून बसले होते. यावेळी नोटांची अदलाबदल करून घेण्यात येणार असल्याची खबर होती.
नोटा बदलण्यासाठी आलेल्या या आंतरराज्य बनावट नोटाप्रकरणी चार जणांना अंकोला पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक पेमानगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी कारवार येथे अटकेची ही कारवाई केली. या छाप्यावेळी 500 रुपयांच्या 26 बनावट नोटा, 500 रुपयांच्या असली 40 नोटा, एक स्कुटी व एक कार यावेळी जप्त करण्यात आली.