Tarun Bharat

महामेळाव्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण

महाराष्ट्रातील पक्षप्रमुखांना मध्यवर्ती म. ए. समितीचे पत्र : उपस्थितीकडे सीमावासियांचे लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 19 रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतेमंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. मध्यवर्ती म. ए. समितीने सर्व पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठवून महामेळाव्यासाठी प्रतिनिधी पाठवून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महामेळाव्यासाठी कोण-कोण नेतेमंडळी उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी हलगा येथे सुवर्णविधानसौध उभारले. मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी दरवर्षी सुवर्णसौध येथे अधिवेशन भरविले जाते. याविरोधात मराठी भाषिक आपला महामेळावा आयोजित करून मराठी भाषा व अस्मितेसाठी लढा देत आहेत. 2006 पासून प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महामेळावा भरविला जातो.

यावर्षीही दि. 19 ते 30 डिसेंबर दरम्यान बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सोमवार दि. 19 रोजी मराठी भाषिकांच्यावतीने महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्याला आपले प्रतिनिधी पाठवून द्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतेमंडळींना मध्यवर्ती समितीकडून पत्र पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

समन्वय मंत्री महामेळाव्याला उपस्थित राहणार का?

महाराष्ट्र सरकारने सीमा समन्वय मंत्रिपदी चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांची निवड केली आहे. मराठी भाषिक कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी ते बेळगावला येणार होते. परंतु त्यांचा हा दौरा होऊ नये यासाठी कर्नाटक सरकारकडून दबाव घालण्यात आला. त्यामुळे किमान 19 तारखेला होणाऱ्या महामेळाव्याला तरी समन्वय मंत्री उपस्थित राहणार का? असा प्रश्न सीमावासीय विचारत आहेत.

Related Stories

जिल्हा कराटे स्पर्धेत अमृता पाटीलचे यश

Amit Kulkarni

सानवी, आयुषी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

चार वर्षांपासून कडोली ग्रा. पं. ग्रामसभेविनाच

Amit Kulkarni

चक्क गटारीमध्येच डेनेज चेंबर; अयोग्य नियोजनाचा फटका

Patil_p

सदलगा पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत अधिकाऱयांच्या जाळय़ात

Omkar B