ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
9 एप्रिलपासून आयपीएल 2021 चा थरार सुरू होत आहे. पण त्यापूर्वीच आयपएलमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. आयपएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीममधील आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू डॅनियल सॅम्स याला कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या तो विलगीकरणात असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
यापूर्वी आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. मात्र, तो मुंबई बरोबर होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही आहे. त्यानंतर आता डॅनियल सॅम्सची भर पडली आहे. त्यामुळे विराट टीमची चिंता वाढली आहे.
दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये डॅनियल सॅम्स हा चौथा खेळाडू आहे, ज्याला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी नितीश राणा, अक्षर पटेल आणि देवदत्त पडीक्कल यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आरसीबीकडून ट्विट करून सांगण्यात आले की, 3 एप्रिल रोजी डॅनिएल सॅम्स चेन्नईच्या हॉटेलमध्ये आला त्यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह होता. त्यानंतर आज म्हणजेच 7 एप्रिल रोजी त्याच्या दुसऱ्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर तो विलगीकरणात असून, सध्या त्याच्यात कोणतही कोरोनाची लक्षणे दिसत नाही आहेत.