ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आयपीएल 2020 चा तेरावा सीझन 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होत आहे. त्यातच युएईमध्ये दाखल झालेल्या सुपर किंग्ज संघासमोर अनेक अडचणी समोर येत आहेत. शुक्रवारी टीम मधील एका खेळाडूला आणि स्टाफ मधील एकाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता आणखी एक धक्का बसला आहे.
CSK चा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना याने आयपीएल मधून माघार घेतली आहे. रैना त्याच्या वैयक्तिक कारणामुळे यूएईमधून भारतात परतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितनुसार सुरेश रैना आयपीएलच्या संपूर्ण सीजनमधून बाहेर झाला आहे. एक दिवस आधी चेन्नईच्या टीममधील 13 जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दुबईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नईच्या टीमची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कोरोना झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, रैनाने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता रैना आयपीएलमधूनही बाहेर झाल्याने चाहत्यांसाठी हा आणखी एक धक्का असणार आहे. त्यामुळे आता चेन्नई संघात सुरेश रैनाच्या जागी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.