Tarun Bharat

इराणमधील संस्कृती रक्षक पोलिसदल बरखास्त

स्री शक्तीच्या हुंकाराने इराणमधील राजकारण ढवळून निघाले आहे. बावीस वर्षीय कुर्दीश महिला महसा अमिनी हिला 16 सप्टेंबरमध्ये पोलिस कोठडीत मृत्यू आल्यानंतर या देशात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झालेली आहे. कट्टरपंथीय शिया सरकारच्या नाकावर टिच्चून महिला आंदोलन करू लागल्या. आपल्या डोक्यावरील हिजाब काढून भररस्त्यावर केस कापू लागल्या. अखेर 2006 पासून कार्यरत असलेले नैतिक तथा संस्कृती रक्षक पोलिस दल बरखास्त करण्याची घोषणा इराणचे ऍटर्नी जनरल मोहम्मद जाफर मोन्ताझारी यांनी केलेली आहे.

इराण सरकारला जनसमुदायाच्या प्रचंढ दबावापुढे झुकावे लागले. गेल्या पंधरावर्षांपासून कार्यरत असलेल्या या पोलिस दलाची गरज नसल्याचे स्पष्ट करत इराण सरकारने हे पोलिसदल बरखास्त करण्याचा निर्णय जारी केला. इराणमधील तत्कालीन कट्टरपंथी राष्ट्राध्यक्ष महंमद अहमदीनिजाद यांनी संस्कृती रक्षक पोलिस दलाची स्थापना केली होती. देशात शरिया कायद्यानुसार सर्व नागरिकांनी व्यवहार करावा, यासाठी या पोलिस दलाची स्थापना केली होती. गस्तीवर राहणारे हे पोलिसदल सार्वजनिक ठिकाणी शरिया कायद्याचे पालन होते की नाही याची देखरेख करत असत. प्रामुख्याने महिलांकडून हिजाबचा वापर, तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांबरोबर पुरुष मार्गदर्शक आदी शरिया कायद्याचे पालन करण्याबाबत संस्कृती रक्षक पोलिसांकडून सक्ती करण्यात येत
असत.

सौदी अरेबियातही संस्कृती रक्षक पोलिसदल कार्यरत होते. पाच वर्षांपूर्वी सौदीचे युवराज महंमद बिन सलमान यांनी आपल्या सुधारणावादी धोरणाला अनुसरून या पोलिस दलाची मान्यता रद्दबातल ठरविली होती. सौदी अरेबियातही महिला आंदोलकांचा जोर वाढलेला असून महिलांना वाहन चालवण्याची मुभा दिलेली आहे. मात्र अजून मोठय़ा महिलांवर लादण्यात आलेली बंधने हटविण्यासाठी दबाव वाढतच आहे. सौदी राजघराण्याला महिलामुक्तीमध्ये काढीचाही रस नाही. पण 2014 नंतर कच्च्या तेलाच्या घसरणीनंतर आखाती देशांना आपल्या अर्थव्यवस्थेला वेगळा आयाम द्यावासा वाटत असल्यानेच सध्या पर्यटनाला वाव देण्याकडे कल दिसून येत आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी देशाची महिलाविरोधी
प्रतिमा दुरुस्त करायची असल्याने मुलींना कॉलेजचे शिक्षण, सरकारी नोकऱयांत मर्यादि प्रमाणात प्रवेश, वाहन चालविण्याची परवानगी आणि संस्कृती रक्षक पोलिसांची बरखास्ती आदी निर्णय घेण्यात आलेले आहेत.

आखाती देश इस्लामिक कट्टरपंथीयांचे स्थान असून सौदी अरेबियातून या धर्माचा फैलाव झाला. संपूर्ण आखातात महिलांवर अनेक बंधने लादलेली आहे. बुरखा, हिजाब आदी पेहराव आजही सक्तीचे आहेत. यात कमी अधिक प्रमाणात महिलांवर यासाठी सक्ती करण्यात येत आहेत. सौदी अरेबिया, इराण, कुवेत, इराक आदी देशांत महिलांना बुरखा अथवा हिजाब सक्तीचा असून संयुक्त अरब अमिराती, ओमान, इजिप्त यासारख्या देशात महिलांना काहीसे स्वातंत्र्य आहेत. इराणमधील 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर तेथील महिलांना बुरख्याखाली दाबण्यात आले. स्वच्छंद जीवनपद्धतीला इराणमधील महिलांना मुकावे लागले. त्याची भरपाई चार दशकांनंतर घेण्याच्या तयारीत इराणी महिला असून संस्कृती रक्षक पोलिस दलाची बरखास्ती ही त्याची पहिली पायरी आहे.

इराणमधील महिलांच्या हिजाब विरोधी आंदोलनामुळे या देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या तीन महिन्याच्या आंदोलन काळात 481 लोकांचा बळी गेला. यात 58 अल्पवयीन आंदोलकांचाही समावेश आहे. तर 18 हजार आंदोलकांना अटक करण्यात आली. इराण सरकारने पोलिस दल बरखास्त केले असले तरी आंदोलन सुरुच आहे. इराण सरकारने एक पाऊल मागे घेतले असे वरकरणी दिसत असले तरी त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. इराण सरकारने महिलांचे आंदोलन आतापर्यंत सक्तीने चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले नसले तरी अंतस्थपणे या आंदोलनातील हवा काढण्याचे हरएक प्रयत्न सुरु आहेत. नैतिक पोलिस दल बरखास्त केल्यानंतर घडलेल्या ताज्या घडामोडीत एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर विषबाधेचा प्रयोग केल्याने तेथील विद्यार्थ्यांचे नियोजित आंदोलन विस्कटवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या घटनेने इराण सरकार वेगवेगळे प्रयोग अवलंबवून हिजाब विरोधी आंदोलन नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

इराणमधील हिजाब आंदोलनाला आता पाठिंबा वाढत आहे. इराणचे सर्वोच नेते आयातोल्ला खामेनी यांच्या भगिनी वाली बद्री हुसैनी यांनी हिजाब आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला असून आपल्या बंधूनी केलेल्या अत्याचाराची लाज वाटत असल्याचे स्पष्ट केले आहे. कतारमधील विश्व फूटबॉल स्पर्धेतील एका सामन्यावेळी इराणच्या संघाने राष्ट्रगीतावेळी पाळलेले मौन हे दमनशाहीविरोधातील मोठे पाऊल होते. परिणामांची तमा न बाळगता फुटबॉलपटूंनी आपल्या देशातील महिलांना दिलेल्या पाठिंब्याला सर्व जगाने बघितला होता. इराणमध्ये सध्या हिजाब आंदोलनाचा विस्तार होत असून तो इराणची राजधानी तेहरानच्या बाहेर हे आंदोलन फोफावत आहे.

इराणचे ऍटर्नी जनरल महंमद जाफर मोन्ताझारी यांनी नैतिक पोलिसदल बरखास्त करत असल्याची घोषणा केली असली तरी हा काही फार मोठा विजय नसला तरी एक पायरी सर झालेली आहे. या घोषणेने इराणी महिलांना 1979 पूर्वी असलेले वेशभूषेचे स्वातंत्र्य लाभणार असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण ऍटर्नी जनरलनी संस्कृती रक्षक पोलिस दलाच्या बरखास्तीची घोषणा करतानाच त्यांनी समाजात कसे वागावे, यासंबंधात न्यायसंस्था काही कठोर निर्बंध लागू करू शकते असे सूतोवाच केल्याने इराण सरकारचा दंडेलशाहीचा नवा चेहरा लवकरच दिसून येणार आहे. 

प्रशांत कामत

Related Stories

हरवलेले शब्द वगैरे

Patil_p

आई जसे बालकाचे लाड पुरविते, त्याप्रमाणेच मी भक्ताचे लाड पुरवतो

Patil_p

सद्गुरूंची सेवा हेच शिष्याचे ध्येय असते

Patil_p

2022ः सापशिडीचा खेळ

Patil_p

तू गं दुर्गा तू भवानी

Patil_p

सत्शिष्य

Patil_p