Tarun Bharat

भारतातील प्रमुख नेत्यांवर ‘आयएस’ची हल्ल्याची योजना

Advertisements

रशियात ‘आयएस’ दहशतवाद्याला अटक ः भारतात मोठय़ा आत्मघाती हल्ल्यांचा कट असल्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली, मॉस्को / वृत्तसंस्था

इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आत्मघाती हल्लेखोराला रशियाने अटक केली आहे. स्पुतनिक या वृत्तसंस्थेने रशियन फेडरल सिक्मयुरिटी ब्रान्चच्या (एफएसबी) अधिकाऱयांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. रशियात पकडलेला हल्लेखोर भारतीय नेतृत्त्वातील बडय़ा नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता. आत्मघाती हल्लेखोर भारतात स्फोट घडवण्याची योजना आखत असल्याचा दावा एजन्सींनी केला आहे. त्यांचे लक्ष्य सत्ताधारी पक्षाचे नेते असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. ‘एफएसबी’ने दहशतवाद्याचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये दहशतवादी भारताचा बदला घेण्याचे बोलत आहे. मी तिथे हल्ला करणार होतो. तेथे मोहम्मद पैगंबर यांचा अपमान करण्यात आला, असे तो म्हणताना दिसत आहे.

इस्लामिक स्टेटच्या (आयएस) आत्मघाती हल्लेखोराला सोमवारी रशियात अटक करण्यात आली. ही अटक रशियन सुरक्षा यंत्रणांनी केली आहे. तो मूळचा मध्य आशियाई देशाचा रहिवासी आहे. पकडलेला आयएसआयएस दहशतवादी तुर्कीमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती झाला होता. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी त्याला रशिया सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. अटक करण्यात आलेला दहशतवादी मध्य आशियाई भागातील एका देशाचा रहिवासी असल्याचे प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच त्याने भारतातील सत्ताधारी वर्तुळातील एका प्रतिनिधीविरुद्ध आत्मघाती दहशतवादी कृत्य करण्याची योजना आखली होती. या दहशतवाद्याला आयएसच्या एका नेत्याने तुर्कीमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती केले होते, असेही सांगण्यात आले आहे.

दहशतवादी कारवायांवर सरकारची नजर

भारतात दहशतवादी कारवाया तीव्र करण्यासाठी विविध संघटना पुन्हा सक्रिय होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा आणि सरकार दहशतवाद्यांवर कडक नजर ठेवून आहे. विशेष म्हणजे इस्लामिक स्टेट आणि त्याच्याशी संलग्न सर्व संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. यासोबतच केंद्र सरकारने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या पहिल्या अनुसूचीमध्येही त्याचा समावेश केला आहे.

सोशल मीडियावर गृह मंत्रालयाची नजर

आयएसआयएस आपली विचारधारा पसरवण्यासाठी विविध इंटरनेट-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांकडून सायबर स्पेसवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यासोबतच कायद्याच्या आधारे दोषींवर कारवाईही सुरू आहे, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

विदेशातील नोकरी सोडून थाटला मत्स्यपालन व्यवसाय

Patil_p

स्वातंत्र्यदिनाच्या संदेशासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन

Patil_p

माझी चौकशी डोमिनिकामध्येच करा!

Patil_p

अंगणवाडी सेविका, सहाय्यिकांना खूशखबर

Patil_p

मोदींना मिळालेली क्लीनचिट कायम

Patil_p

देशात प्रथमच हिंदीत वैद्यकीय शिक्षण

Amit Kulkarni
error: Content is protected !!