मुतगा येथील खूनप्रकरणाच्या तपासासाठी ग्रामीण भागात दवंडी : तीन दिवसानंतरही गूढ कायम
प्रतिनिधी / बेळगाव
मुतगा (ता. बेळगाव) येथे घडलेल्या भीषण खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी ग्रामीण भागात दवंडी पिटविली आहे. तुमच्या गावातील कोणी तरुण बेपत्ता झाला आहे का हो? अशी दवंडी पिटविण्यात येत असून सुमारे 12 जणांचे पथक मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी कामाला लागले आहे.
मंगळवार दि. 5 जुलै रोजी सकाळी मुतगा येथील शशिकांत मल्लाप्पा अष्टेकर यांच्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. साखळीने त्याचे हात व पोटाला बांधण्यात आले होते. तर दोरीने दोन्ही पाय बांधून शिर धडावेगळे केलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचे आढळून आले होते. तीन दिवसानंतरही मृतदेह कोणाचा याचा उलगडा झाला नाही. दोन दिवस पोलिसांनी ग्रामीण भागात दवंडी पिटविली असून मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, मुचंडीसह सुमारे दहा हून अधिक गावांत दवंडी पिटवून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी मारिहाळ पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीसनिरीक्षक महांतेश बस्सापूर व त्यांच्या सहकाऱयांनी तपास हाती घेतला आहे. तालुक्मयातील वेगवेगळय़ा ग्राम पंचायतींना भेटी देवून बेपत्ता तरुणा विषयी माहिती मिळविण्यात येत आहे. केवळ बेळगावच नव्हे तर शेजारी जिह्यातही पोलीस रवाना झाले आहेत. हुबळी-धारवाड, बागलकोट, विजापूर पोलिसांशी संपर्क साधून बेपत्ता तरुणांसंबंधी माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच गुन्हेगार कोण? याचा उलगडा होणार आहे. तिसऱया दिवशीही पोलिसांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. गुरूवारी रात्रीपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.