वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा एक वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचा चालक मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दहशतवादी हल्लयात मारला गेला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या भागात आयएसआय अधिकाऱयाच्या वाहनाला लक्ष्य करत हल्ला करण्यात आला होता.
दक्षिण वजीरिस्तानमध्ये आयएसआयचे ब्रिगेडियर मुस्तफा कमाल बरकी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने दिली आहे. आयएसआयचे ब्रिगेडियर बरकी हे अंगूर अड्डा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत. यादरम्यान सैन्य आणि दहशतवाद्यांदरम्यान मोठय़ा प्रमाणात गोळीबार झाला आहे.
ब्रिगेडियर बरकी हे सैन्याच्या पथकाचे नेतृत्व करत होते असे सांगण्यात येत आहे. चकमकीत पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचे 7 जण जखमी झाले असून यातील दोघांची स्थिती गंभीर आहे. पाकिस्तानचे सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणा देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी संकल्पबद्ध असल्याचे पाकिस्तानी सैन्याने बरकी यांच्या मृत्यूनंतर म्हटले आहे.
पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी बरकी यांच्या मृत्यूप्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना धडा शिकविला जाणार असल्याचे बिलावल यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही ब्रिगेडियर बरकी यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
डेरा इस्माइल खानमध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाली असून यात पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेले आहेत. तसेच या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री खट्टी भागात एका पोलीस स्थानकावर हल्ला केला होता.