वाहतूक पोलिसांचा इशारा : आयएसआय मानांकन नसणाऱया हेल्मेटवर बंदी
प्रतिनिधी /पणजी
‘आयएसआय’ मानांकन असणारी हेल्मेट मान्य करण्यात येणार असून विना आयएसआय मानांकन हेल्मेट दुचाकीस्वाराला मान्य केली जाणार नाहीत तर तो हेल्मेट शिवाय असल्याचे गृहित धरुन नवीन कायद्यानुसार त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
विना आयएसआय मानांकन असणारी हेल्मेट अपघातात उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वाराला आयएसआय मानांकन असणारी हेल्मेट आवश्यक आहेत असा खुलासा वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आला आहे. अनेक दुचाकीस्वार आयएसआय मानांकन नसणारी हेल्मेट घालून फिरत असल्याचे समोर आले असून त्यांच्यासाठी हा खुलासा करण्यात आला आहे. आयएसआय मानांकन नसणाऱया हेल्मेटवर बंदी घालण्यात आली असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी वाहतूक विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे.
आयएसआय मानांकन नसणारी हेल्मेट घातल्यामुळे अपघातात त्याचा कोणताही फायदा होत नाही तर जखमी होण्याचे प्रमाण जास्त आहे असा निष्कर्ष वाहतूक विभागाने काढला आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांना आयएसआय मानांकनाची हेल्मेट घातल्याशिवाय पर्याय नाही आणि ते जर नसेल तर दंड भरावा लागणार आहे.