मदरशांमध्ये तरुणांना जिहादी व्याख्याने दिल्याचे उघड
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचे नवे षड्यंत्र उघड झाले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने किश्तवाड आणि दोडा या जम्मू-काश्मीरच्या जिल्हय़ात दहशतवादाला खत-पाणी घालण्याचा नवा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे एका मौलवीला पकडण्यात आले असून अब्दुल वाहिद असे त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या ‘काश्मीर जानबाज फोर्स’ या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. मदरशांमध्ये आपली पकड कायम ठेवण्याची आणि नेटवर्क मजबूत करण्याची जबाबदारी आयएसआयने त्याच्यावर सोपवली होती.
दहशतवादी अब्दुल वाहिद हा किश्तवाड जिह्यातील पाच मदरशांमध्ये मुलांना व्याख्याने देत होता. तेथील मुलांना दहशतीच्या मार्गावर चालण्यास तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच दहशतवादी नेटवर्कमध्ये नवीन तरुण जोडण्यासाठी तो तरुणांचे मनपरिवर्तन करत असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. आपले कर्तव्य पार पाडत असतानाच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती आयएसआयच्या एजंटांना सीमेपलीकडे पुरवत होता.
भारती सुरक्षा यंत्रणांच्या गुप्तचर पथकाने या दहशतवाद्याला अटक केली. एजन्सीच्या चौकशीत त्याने सीमेपलीकडील दहशतवादी संघटनेचा कमांडर उमर तय्यब याच्यामार्फत मोठी रक्कम मिळवत असल्याची कबुली दिली. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमेपलीकडील दहशतवादी संघटना आयएसआयच्या अधिकाऱयांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले.