जमियत’चे अध्यक्ष मोहम्मद मदनी यांच्या विधानाने नवा वाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इस्लाम हा जगातील सर्वात जुना धर्म आहे, हे विधान करुन जमियात उलेमा ए हिंद या इस्लामी संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद मदनी यांनी नवा वाद उकरुन काढला आहे. त्याचप्रमाणे, भारत हा देश जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचा आहे, तसाच तो मोहम्मद पैगंबर यांचाही आहे, असेही विधान त्यांनी केले. ते त्यांच्या संघटनेच्या वार्षिक सम्मेलनात बोलत होते.
याच भाषणात त्यांनी इस्लाम हा सर्वात जुना धर्म असल्याचे प्रतिपादन केले. इस्लामची स्थापना साधारणतः इसवी सन 610 मध्ये झाली अशी मान्यता आहे. हिंदू धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म आदी धर्मांचा इतिहास इस्लाम धर्मापेक्षाही पुरातन आहे,, असे तज्ञांचे मत आहे, तथापि, इस्लाम धर्मच सर्वात जुना असे प्रतिपादन करुन त्यांनी नवा वाद निर्माण केला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मदरसा विद्यार्थ्यांना नोकऱया द्या
इस्लामी मदरशांमधून शिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना नोकऱया दिल्या जात नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. मदरशांमधील शिक्षणाला महत्व मिळत नाही. कित्येक मुस्लीमांचाही मदरशांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दूषित असतो, असा दावा त्यांनी केला. मदरशांनी आधुनिक शिक्षणाला महत्व दिले पाहिजे, हे त्यांनी मान्य केले.
जास्तीत जास्त मतदार नोंदवा
शुक्रवारी या संघटनेने तिच्या वार्षिक अधिवेशनात मतदानासंबंधी प्रस्ताव संमत केला. जास्तीत जास्त प्रमाणात मुस्लीम मतदारांची नोंद करावी असा आदेश या संघटनेने आपल्या जिल्हास्तरीय शाखांना दिला. मुस्लीमांना अधिकाधिक प्रमाणात मतदानाला प्रवृत्त करावे, अशी सूचना यावेळी विविध पदाधिकाऱयांनी केली. मुस्लीमांची नावे मतदारसूचींमधून काढली जाऊ नयेत म्हणून जिल्हा पातळीवर दक्षता समित्या स्थापन करण्याचा निर्णयही या संघटनेने घेतला आहे.