व्हॉइस ऑफ खुरासानमध्ये पीएफआयचे कौतुक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट आता प्रतिबंधित पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या समर्थनार्थ सरसावली आहे. इस्लामिक स्टेटने स्वतःचे कथित नियतकालिक व्हॉइस ऑफ खुरासानमध्ये पीएफआय आणि एसआयएमआय संबंधी एक लेख प्रकाशित केला आहे. या पूर्ण लेखात पीएफआयचे कौतुक करण्यात आले असून पोलिसांच्या कारवाईला मुस्लिमविरोधी ठरविण्यात आले आहे.
गायींची पूजा करणाऱया भारत सरकारने तथाकथित दहशतवादी गटांसोबत कथित स्वरुपात संबंध बाळगल्याप्रकरणी भारतीय मुस्लिमांमध्ये लोकप्रिय संघटना पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियावर 5 वर्षांसाठी बंदी घातली असल्याचे इस्लामिक स्टेटने नमूद केले आहे. पीएफआयवर अलिकडेच केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.
बिहारमध्ये अजूनही पीएफआयच्या विरोधात एनआयएकडून कारवाई केली जात आहे. एनआयएने पीएफआयप्रकरणी जितौरा गावातून इरशाद बेलाल या आरोपीना अटक केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 28 सप्टेंबर रोजी पीएफआयवर युएपीए अंतर्गत 5 वर्षांसाठी बंदी घातली होती. पीएफआयकडून वेगवेगळय़ा जाती-धर्माच्या लोकांदरम्यान द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता असा आरोप आहे. पीएफआयकडून तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी चिथावले जात होते. याचमुळे पीएफआयविरोधात तपास यंत्रणांनी धडक कारवाई केली आहे.