बेटावर होते देवीची पूजा
जगाच्या कानाकोपऱयात स्वतःच्या भौगोलिक आणि सामाजिक स्थितीनुसार वेगवेगळे नियमकायदे शतकांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. या नियमांना आता परंपरा म्हणून पाळले जाते. अशाच एका बेटावर अनोखी परंपरा आहे. या बेटावर केवळ पुरुषच राहू शकतात. या बेटावर कुठल्याही महिलेला जाण्यास मनाई आहे. येथे पुरुष समुद्राची देवीच्या स्वरुपात पूजा करतात तरीही महिलांच्या प्रवेशावर येथे बंदी आहे.
हे बेट जपानमध्ये असून त्याला ओकिनोशिमा या नावाने ओळखले जाते. महिलांच्या प्रवेशावर बंदी असण्यासह अनेक कठोर नियमांचे पालन तेथे करावे लागते. ओकिनोशिमा बेटाला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ घोषित केले आहे. हे बेट एकूण 77 चौरस मीटरमध्ये फैलावलेले आहे. चौथ्या ते नवव्या शतकापर्यंत हे बेट कोरिया आणि चीनमधील व्यापाराचे मुख्य केंद्र ठरले होते.
या बेटाला धार्मिक स्वरुपात अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु या बेटावर प्राचीन काळापासून चालत आलेली धार्मिक बंधने आजही पाळली जातात. याच बंधनांपैकी एक म्हणजे महिलांच्या प्रवेशावरील बंदी आहे. येथे येणाऱया पुरुषांसाठीही काही कठोर नियम असून त्यांचे पालन करावे लागते.
या बेटावर जाण्यापूर्वी पुरुषांना निर्वस्त्र होत आंघोळ करावी लागते. येथील कठोर नियमामुळे पूर्ण वर्षात केवळ 200 पुरुषच येऊ शकतात. तसेच येथे जाताना त्यांना स्वतःसोबत कुठलीच गोष्ट नेता येत नाही. याचबरोबर या बेटासाठीचा दौरा गुप्तच ठेवावा लागतो. या बेटावर ताइशा ओकित्सु मंदिर असून तेथे समुद्राच्या देवीची पूजा होते. 17 व्या शतकात सागरी प्रवासादरम्यान जहाजांच्या सुरक्षेसाठी येथे पूजा केली जात होती असे सांगण्यात येते.