सीबीआयचा केरळ उच्च न्यायालयात गौप्यस्फोट, नंबी नारायणन यांचा विनाकारण बळी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नव्वदच्या दशकात भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या संबंधात घडलेले हेरगिरी प्रकरण हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते, असा सनसनाटी गौप्यस्फोट सीबीआयने केरळमधील उच्च न्यायालयात केला आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी संस्थेची गुपिते फोडली होती असा आरोप करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तथापि, वैज्ञानिकांवरील हे आरोप धादांत खोटे होते, असेही सीबीआयने न्यायालयात स्पष्ट केले असून आरोपींच्या जामिनाला विरोध केला.
जेव्हा हे कथित हेरगिरी प्रकरण बाहेर आले होते तेव्हा श्रेष्ठ वैज्ञानिक नंबी नारायणन हे इस्रोचे लिक्विड प्रोपेलंट इंजिन संशोधक होते. त्यांना या हेरगिरी कांडात फसविण्यात आले होते. नंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. तथापि, आता सीबीआयने असे प्रतिपादन केले आहे की, नंबी नारायणन यांची अटक बेकायदेशीर असून ती आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग होती.
केस डायरी सादर करणार
इस्रोची कथित हेरगिरी हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते हे सिद्ध करण्यासाठी सीबीआय त्यावेळच्या तपासाची केस डायरी न्यायालयात सादर करणार आहे. भारताच्या अग्निबाणासंबंधीचे तंत्रज्ञान नंबी नारायणन यांनी मारियम रशिदा नामक एका महिलेच्या जाळय़ात सापडून पाकिस्तानला विकली होती, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ही घटना 1994 मधींल होती. याच आरोपात नारायणन यांना अटक करण्यात आली होती. तथापि, नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. आता या प्रकरणी हे कारस्थान करणाऱया अधिकाऱयांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. अधिकाऱयांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
1998 मध्ये नंबी नारायणन यांना सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा दिला होता. त्यांची कारागृहातून सुटका करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. नारायणन यांना 50 दिवस कारागृहात, ते निर्दोष असूनही काढावे लागले होते. नारायणन यांनी या घटनांवर एक पुस्तकही लिहिले आहे. अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला रोखण्यासाठी हे कारस्थान केले होते, असा आरोप नारायणन यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.