जीएसएलव्ही एमके 3’च्या यशस्वी उड्डाणाने रचला इतिहास ः 36 विदेशी उपग्रह अंतराळात
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शनिवारी मध्यरात्री 12ः07 वाजता आपल्या ‘जीएसएलव्ही एमके 3’ या सर्वात वजनदार अग्निबाणाच्या सहाय्याने 36 विदेशी उपग्रह अंतराळात पाठवत ऐतिहासिक व्यावसायिक प्रक्षेपण केले. ब्रिटनच्या कम्युनिकेशन नेटवर्क ‘वन वेब’चे 36 उपग्रह यशस्वीपणे अंतराळात लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये दाखल झाल्याची माहिती इस्रोने दिली. आतापर्यंत पीएसएलव्हीच्या माध्यमातून व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण झाले होते. आता ‘जीएसएलव्ही एमके 3’ या बाहुबलीच्या सहाय्याने मोठी झेप घेतल्यामुळे भारताने व्यावसायिक बाजारपेठेत दमदार प्रवेश करत इस्रो आणि एनएसआयएलसाठी नवीन व्यासपीठ उघडले आहे.
आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आलेले विदेशी उपग्रह ब्रिटनच्या ‘वन वेब’ या कम्युनिकेशन नेटवर्कचे आहेत. इस्रोची ही पूर्णपणे व्यावसायिक मोहीम आहे. इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘एनएसआयएल’ने हे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी ‘वन वेब’सोबत सेवा करारावर स्वाक्षरी केली असल्याचे एनएसआयएलचे अध्यक्ष आणि एमडी राधाकृष्णन डी यांनी सांगितले.
व्यावसायिक मोहिमेतून दिवाळी भेट
‘जीएसएलव्ही एमके 3’ या प्रक्षेपक किंवा अग्निबाणाची लांबी 43.5 मीटर आहे. या अग्निबाणाच्या मदतीने 5,796 किलो वजनाचे वजन वाहून नेणारे हे पहिले भारतीय रॉकेट ठरले आहे. हा प्रक्षेपक 8,000 किलो उपग्रह वजन उचलू शकतो. ‘जीएसएलव्ही एमके 3’ हे त्रिस्तरीय रॉकेट असून त्यामध्ये दोन सॉलिड मोटर स्टेप्स आणि एक प्रोपोलेंट स्टेज आहे. मध्यभागी एक क्रायोजेनिक स्टेज आहे. वजनदार आणि भक्कमपणामुळे या प्रक्षेपकाला इस्रोचा बाहुबली असेही म्हटले जाते. ‘जीएसएलव्ही एमके 3’ आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला. या प्रक्षेपणासह, इस्रोने सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे.
व्यावसायिक मोहीम सुरूच ठेवणार ः इस्रो
यशस्वी मोहिमेच्या माध्यमातून भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सर्व्हिस मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदविला आहे. 8,000 किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आम्ही दाखवून देऊ शकतो, असे यशस्वी मोहिमेनंतर इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात ‘एलव्हीएम 3’द्वारे 36 ‘वन वेब’ उपग्रहांचा आणखी एक सेट लाँच केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या उड्डाणाकडे जगाचे लक्ष
जगातील बहुतेक देश आता त्याच्या सर्वात मोठय़ा प्रक्षेपणासाठी भारताकडे पाहतो. कारण भारताने आतापर्यंत 300 हून अधिक व्यावसायिक प्रक्षेपणे यशस्वी केली आहेत. त्यामुळे इस्रोसाठी आजचे हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वपूर्ण होते. कमी खर्चातही ध्येय कसे साधले जाऊ शकते. कमी बजेटमध्ये मंगळावर पोहोचून भारताने ते दाखवून दिले होते. त्यामुळे इस्रोवर संपूर्ण जगाचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रक्षेपणाच्या यशाने इस्रोने जगभरात आपली क्षमता सिद्ध केली आहे.