‘पीएसएलव्ही-सी53’च्या उड्डाणाने जगभरात भारताची विश्वासार्हता सिद्ध : ‘डीएस-ईओ’मध्ये कोणत्याही हवामानात दिवस-रात्र छायाचित्रे घेण्याची क्षमता
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
इस्रोने आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथे ‘पीएसएलव्ही-सी53/डीएस-ईओ’सह तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. ‘डीएस-ईओ’ उपग्रहामध्ये कोणत्याही हवामानात दिवस आणि रात्र छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे. सर्व उपग्रह दुसऱया क्रमांकाच्या पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले. ‘डीएस-ईओ’ ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉडय़ूलसह एक व्यासपीठ म्हणून पृथ्वीभोवती फिरेल आणि वेगवेगळय़ा कोनातून पृथ्वीची छायाचित्रे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. एका आठवडय़ातील आपल्या दुसऱया यशस्वी व्यावसायिक मोहिमेत इस्रोने गुरुवारी ‘पीएसएलव्ही-सी53’वरील तीन परदेशी उपग्रह अचूक कक्षेत प्रक्षेपित केले. साहजिकच या यशस्वी मोहिमेमुळे भारतीय अंतराळ संस्थेचे विश्वसनीय प्रक्षेपण वाहन पुन्हा एकदा विश्वासार्ह रॉकेट म्हणून ओळखले जाईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरुवारी सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. हे सर्व उपग्रह सिंगापूरचे असून ते ‘पीएसएलव्ही-सी53’वर प्रक्षेपित करण्यात आले होते. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) या व्यावसायिक शाखेचे हे दुसरे मिशन आहे. तर इस्रोच्या ‘पीएसएलव्ही’चे हे 55 वे मिशन आहे.
डीएस-ईओ आणि न्यूसार हे दोन्ही उपग्रह सिंगापूरच्या रिपब्लिक ऑफ कोरियाच्या स्टारेक इनिशिएटिव्हने बनवले आहेत. तर स्कूब-1 हा उपग्रह सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने तयार केला असून तो 2.8 किलो वजनाचा आहे. हे तिन्ही उपग्रह दक्षिण कोरियामध्ये तयार करण्यात आले आहेत. या तीन उपग्रहांचे एकूण वजन 522.8 किलो आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी यशस्वी मोहिमेची माहिती देत मिशनने आपले उद्दिष्ट साध्य केल्याचे स्पष्ट केले.