चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुकोद्गार : सेवा देण्याचा ‘लोकमान्य’चा उपक्रम अभिनंदनीय
प्रतिनिधी /पुणे
मागच्या काही वर्षांत वेगवेगळय़ा आर्थिक संस्था अडचणीत आल्या असताना ‘लोकमान्य सोसायटी’ने आपल्या कामकाजात उत्तम समतोल साधला आहे. त्यामुळे संस्थेवरील लोकांचा विश्वास वाढला असल्याचे कौतुकोद्गार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे काढले.
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’च्या शास्त्री रोड, पुणेस्थित ‘ग्राहकसेवा लाउंज’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांच्यासह उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, विठ्ठल प्रभू, पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, मुख्य सुरक्षा अधिकारी दीपक गुरूंग आदी उपस्थित होते.
चंद्रकांतदादा म्हणाले, ‘तरुण भारत’सारखे परखड वृत्तपत्र किरण ठाकुर चालवितात. त्याचबरोबर ‘लोकमान्य’च्या रुपाने सहकार व आर्थिक क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवल्याला आता अनेक वर्षे लोटली आहेत. 1995 साली सुरू झालेल्या ‘लोकमान्य सोसायटी’चा प्रवास मल्टिस्टेट, मल्टिपर्पजपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आता संस्थेने आपले केंद्रही पुण्यात हलविले आहे. 1995 ते 2022 या कालावधीचा विचार करता या काळात मोठय़ा प्रमाणात आर्थिक संस्था अडचणीत आलेल्या पाहायला मिळतात. मात्र, ‘लोकमान्य’ने उत्तम समतोल साधून लोकांचा विश्वास जिंकला आहे.
देशाच्या वेगवेगळय़ा भागात संस्थेच्या शाखांचा विस्तार झाला असून, शाखांची संख्या 213 वर पोहोचली आहे. ठेवीही 7 हजार कोटींवर पोहोचल्या आहेत, ही निश्चित चांगली बाब आहे. एक वेळ हा आकडा कमी झाला तरी चालेल; पण सर्वसामान्य माणसाला आपले पैसे सुरक्षित आहेत, असे वाटले पाहिजे. विशेष म्हणजे एकाच छताखाली सर्व आर्थिक सेवा देण्याचा ‘लोकमान्य’चा उपक्रम अभिनंदनीय असाच आहे. सामाजिक जाणीव ठेऊन संस्थेकडून अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘लोकमान्य’ची पुढील वाटचालही अशीच सुरू राहो, अशा शुभेच्छाही चंद्रकांतदादांनी यावेळी दिल्या.
प्रास्ताविकात किरण ठाकुर म्हणाले, 2006 मध्ये पुण्यातील एस. एम. जोशी इमारतीत तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ‘लोकमान्य’ची पहिली शाखा सुरू झाली. साथी किशोर पवार यांच्यामुळे ‘लोकमान्य’ला ही जागा मिळाली. आता आमची 7 हजार कोटी रुपयांच्या ठेवींच्यादृष्टीने वाटचाल सुरू असून, त्यातील दोन हजार कोटी पुणेकरांचे आहेत. संस्थेची वेगाने घोडदौड सुरू आहे. या ‘लाउंज’मध्ये एकाच छताखाली ग्राहकांना सर्व सेवा मिळणार असून, गुंतवणूकविषयक मार्गदर्शनही मिळेल. सुनील मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सुशील जाधव यांनी आभार मानले.