Tarun Bharat

समाजाला विचार देणे महत्त्वाचे

सुमित्रा महाजन : लोकमान्य सोसायटीला सदिच्छा भेट : एकत्रित प्रयत्नांतूनच भरीव कार्य होण्याचा दिला विश्वास

प्रतिनिधी /बेळगाव

समाजाला केवळ अर्थसाहाय्य करून चालणार नाही तर त्या कामासोबत एक विचारही द्यायला हवा. केवळ सरकार परिवर्तन करू शकणार नाही तर सरकारला समाजाचा पाठिंबा हवा. सरकार आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच भरीव कार्य होऊ शकेल, असा विश्वास लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केला.

येथील लोकमान्य सोसायटीच्या गुरुवारपेठ येथील कार्यालयाला त्यांनी मंगळवारी सदिच्छा भेट दिली. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त त्या बेळगावला आल्या होत्या. त्यांच्या समवेत मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सुपुत्र मिलिंद आणि स्नुषा स्नेहल उपस्थित होत्या.

त्या म्हणाल्या, मराठी माणूस कोठेही गेला तरी आपल्या कामाची छाप ठेवतो. तो प्रामाणिकपणेच काम करतो. समाजाला केवळ अर्थसाहाय्य करून चालणार नाही तर त्या सोबत एखादा चांगला विचार आपल्याला पेरता यायला हवा. सामाजिक कार्यातूनच राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाल्यास ती व्यक्ती चांगली छाप उमटवू शकते.

परिवर्तनासाठी एकत्र या

राजकारणात असल्यास त्या व्यक्तीच्या नावाने शाळा किंवा मोठ्या शैक्षणिक संस्था असाव्याच लागतात, असा भोळ्याभाबड्या जनतेचा समज आहे. हा समज खोडून काढत आपल्याला परिवर्तन करावयाचे आहे आणि त्यासाठीच सर्वांनी एकत्र यायला हवे.

यावेळी लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते सुमित्राताईंना पुष्पगुच्छ देण्यात आले. संचालक गायत्री काकतकर यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला. उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांनी त्यांना भेटवस्तु दिली, तसेच मिलिंद महाजन यांचाही त्यांनी सत्कार केला. श्री महिला सोसायटीच्या चेअरपर्सन प्रतिभा दडकर यांच्या हस्ते स्नेहल महाजन यांचा सत्कार करण्यात आला. संचालक पंढरी परब यांनी स्वागत केले.

अडचणींचे निवारण होणे आवश्यक

यावेळी किरण ठाकुर म्हणाले, लोकमान्यमध्ये 70 टक्के महिला असून आज लोकमान्यच्या 213 शाखा आहेत. लोकमान्य टिळकांचे स्वराज्याचे सुराज्य करण्याचे ध्येय समोर ठेऊन ‘लोकमान्य’ची वाटचाल सुरू आहे. टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही घोषणा बेळगावमध्येच दिली आहे. आज 27 वर्षांत लोकमान्यने सर्वांना उत्तम सेवा दिली आहे. शिवाय 32 गावे दत्तक घेण्यात आली असून त्या ठिकाणी सर्व त्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. सहकार ही मोठी ताकद व्हायला हवी. त्यासाठी सहकार क्षेत्रासमोर असलेल्या अडचणींचे निवारण मात्र होणे आवश्यक आहे.

याप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे सर्व संचालक तसेच आयएनएसचे सदस्य अजयकुमार तसेच बृहन्महाराष्ट्र शाखा बेळगावचे नितीन कपिलेश्वरी उपस्थित होते. विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

फॅन्सी नंबर प्लेट ; दुचाकीस्वारांवर कारवाई

Amit Kulkarni

शिवबसव ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी

Patil_p

दहावी परीक्षेसाठी शिक्षण खाते सज्ज

Omkar B

अलीकडच्या काळात मळणी कामात पुरुषांपेक्षा महिलाच अधिक

Patil_p

उचगाव शिवारातील रस्ता डांबरीकरणाचे आश्वासन

Amit Kulkarni

वाढीव घरपट्टी रद्द करण्यासंदर्भात नगरविकास खात्याला पत्र

Patil_p