काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांचा दावा : पंचायत निवडणूक वेळेत घेण्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसचे काही आमदार फुटणार आणि भाजपमध्ये जाणार ही भाजप नेत्यांनी निर्माण केलेली अफवा असून ती निराधार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते तथा गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. गोवा राज्यातील पंचायत निवडणूक वेळेत घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे केली असून त्यासाठी भाजपने चालवलेला वेळकाढूपणा काँग्रेस पक्ष खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुंडू राव बोलत होते. ते म्हणाले की, पंचायत निवडणूक भाजप मुद्दाम पुढे ढकलत असून वेळकाढूपणाचे धोरण आखण्यात आले आहे. ते त्या पक्षाने सोडून द्यावे आणि वेळेवर पंचायत निवडणूक घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
राज्यात जनसंपर्क मोहिमेचे आयोजन
भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त गोवा राज्याच्या दोन्ही जिल्हय़ात प्रत्येकी 75 किमी पदयात्रा काढण्याचे ठरविण्यात आले असून त्यातून जनसंपर्काची मोहीम आखण्यात आली आहे. काँग्रेस पक्षातर्फे राजकीय व्यवहार समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात वरिष्ठ नेत्यांना स्थान देण्यात येणार आहे. काँग्रेसचे नवीन गटाध्यक्ष, समित्या नेमल्या जाणार असून ती प्रक्रिया जून महिन्यात पूर्ण करण्याचा इरादा असल्याचे म्हणाले.
येत्या तीन महिन्यांत म्हणजे नव्वद दिवसांत काँग्रसचे नेते, पदाधिकारी बूथ पातळीवर भेटी देऊन तिथे समित्यांची नेमणूक करणार आहेत. उदयपूर येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय चिंतन शिबिरातील ठरावानुसार वरील कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.