मुलांमध्ये येतो चिडचिडेपणा, आक्रमक वर्तन
अनेकदा लहान मुले अधिक हट्ट करू लागल्यावर किंवा रडू लागल्यावर त्यांना शांत करण्यासाठी आईवडिल मोबाइल हाती सोपवितात. यामुळे ते मूल तत्काळ शांत झाले तरीही याचे अनेक गंभीर परिणाम समोर आले आहेत. मुलांच्या पालनपोषणाशी निगडित ही एक मोठी चूक आहे.
मिशिगन मेडिसीनमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार मुलांना शांत करण्यासाठी मोबाइल देणे त्यांना मानसिक रुग्ण करू शकते. मोबाइलमुळे या मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो आणि अनेकदा आव्हानात्मक स्थितीत ती आक्रमक वर्तन करू लागतात. यामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी होते तसेच त्यांच्या वर्तनात वाढत्या वयासोबत परिवर्तन घडते. अशा स्थितीत मुले भावनात्मक स्वरुपात अत्यंत कमजोर होतात. याचा प्रभाव मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक दिसून येत आहे.
3-5 वयोगटातील मुलेमुली
जामा पीडियाट्रिक्समध्ये मिशिगन मेडिसीनच्या अध्ययनानुसार 3-5 वयोगटातील मुलांना शांत करण्यासाठी स्मार्टफोन आणि टॅबलेट सारखे उपकरण वारंवार देण्यात आल्याने मुलांमध्ये भावनात्मक विकृती निर्माण होऊ शकते. स्क्रीन टाइम वाढल्याने त्यांचे वर्तन नकारात्मक होत आहे. तसेच आव्हानात्मक स्थितीत त्यांची प्रतिक्रिया चुकीची दिसून येते. याचबरोबर शरीरात एक प्रकारची शिथिलता येते, मुलांमध्ये मूड स्विंग्स होण्यास सुरुवात होते, अनेकदा मुले अत्यंत उत्तेजित होतात, तर कित्येकवेळा चेहऱयावर उदासी अन् निराशा पसरते. अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास मुलांना मोबाइल देणे त्वरित बंद करावे.
अन्य गोष्टींमध्ये लक्ष वळवावे
मुलांना शांत करण्यासाठी अनेक पर्यायी कृतींचा वापर केला जाऊ शकतो, यामुळे त्यांच्या विकासात मदत होते. झोपाळा, टॅम्पोलिनवर उडय़ा मारणे, खेळ, गाणी ऐकणे यासारख्या कृतींमधून मुलांचे लक्ष दुसरीकडे वळविता येते असे प्रमुख संशोधक रेडेस्की यांनी म्हटले आहे.