सोमवारीही साऱयांचीच उडविली तारांबळ : झाडे-फांद्या कोसळण्याचे प्रकार : पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान


प्रतिनिधी /बेळगाव
जोरदार वाऱयासह सोमवारी पुन्हा पावसाचे आगमन झाल्यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. वाऱयामुळे सुरक्षित ठिकाणी अनेकांनी धाव घेतली. कारण गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाऱयासह पडलेल्या पावसामध्ये अनेक झाडे कोसळली आहेत. झाड कोसळून एकाचा जीवदेखील गेला आहे. त्यामुळे भीतीने अनेकांनी सुरक्षित ठिकाण शोधून पाऊस जाण्याची वाट पाहिली.
सोमवारी दुपारीच काही भागांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. त्यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली. रात्री 8 च्या दरम्यान पुन्हा जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाले. शहापूर, खासबाग परिसरात जोरदार वाऱयाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरामध्येही जोरदार वारा सुरू झाला होता. पाऊस आणि वाऱयामुळे वीजपुरवठाही काही ठिकाणी खंडित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले आहे. पावसापेक्षा वाऱयालाच अधिक जोर असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे.
झाडे, विद्युतखांब कोसळून नुकसान झाले असून चार दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ झाड कोसळून 20 हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले होते. याचबरोबर काही ठिकाणी विद्युतखांब कोसळून हेस्कॉमचेही मोठे नुकसान झाले आहे.
फेरीवाले, भाजीविपेत्यांना फटका
सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. फेरीवाले, भाजीविपेते यांसह इतर व्यापाऱयांनाही याचा फटका बसला. पाऊस पडल्यामुळे रस्त्यावरील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. त्यामधून वाट काढताना नागरिकांची चांगलीच दमछाक उडत होती. दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे साऱयांनाच या पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडला. जोरदार वाऱयामुळे आणि पावसामुळे झाडेदेखील कोसळली आहेत. दररोज पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसत आहे. सध्या मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत तर बटाटा काढणीही खोळंबली आहे. सोमवारी काकती, होनगा, यमनापूर, उचगाव, तुरमुरी यासह इतर परिसरात दमदार पाऊस कोसळला आहे.
तालुक्यात अवकाळी संकट कायम
बेळगाव तालुक्यात वळिवाचे संकट कायम आहे. सोमवारीही वळीव पावसाने तालुक्याला झोडपून काढले. सोमवारी दुपारी व सायंकाळी झालेल्या वादळी वाऱयाच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याचे प्रकार घडले. तसेच वळिवाचा पाऊस विश्रांती घेणार तरी कधी, याची चिंता साऱयांनाच लागून राहिली
आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून वारंवार पाऊस होत आहे. यामुळे नागरिक वैतागले आहेत. दिवसभर उष्णतेमध्ये वाढ होऊन त्यानंतर पाऊस पडत आहे.
असे चित्र पंधरा दिवसांपासून सुरुच आहे. सोमवारीही सकाळपासूनच उष्णतेमध्ये वाढ झाल्याचे जाणवून आले. दुपारी विजांचा कडकडाट सुरु झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाले. अन् वादळी-वाऱयासह पाऊस पडला. यामुळे शेतकऱयांची शेतात काम करीत असताना पुन्हा एकदा झोपच उडाली. कारण तालुका परिसरात वळिवामुळे ठिक-ठिकाणी वीज कोसळून झाडे पडण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडलेले आहेत. त्यामुळे सोमवारी विजांच्या कडकडाटासह सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱयांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतातील ज्वारी, कोथिंबीर, लाल भाजी, मेथी, मिरची, कोबी, फ्लॉवर आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याच्या पश्चिम भागात वळिवाचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे बटाटा काढणीची कामे खोळंबली आहेत.
वळिवाच्या पावसामुळे आंबा व काजू बागायतांचेही मोठे नुकसान झाले. यामुळे बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे. रात्री उशिरापर्यंत वळिवाचा पाऊस सुरुच होता.
बेळगाव-चोर्ला रोडवर सायंकाळी व्हीटीयूनजीक झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या होत्या. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली होती. हेस्कॉमचे कर्मचारी वाहतुकीला मार्ग करून देण्यासाठी प्रयत्न करत होते.