हंसिका मोटवानीने वैयक्तिक आयुष्याचे उलगडले पदर
हंसिका मोटवानीने ‘कोई मिल गया’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली होती. त्यानंतर पासूनच तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे. हंसिकाने आता स्वतःच्या आयुष्याबद्दल मन मोकळे केले आहे. विवाहापूर्वी हंसिका ही एसटीआर सिंबूसोबत रिलेशनशिपमध्ये होती, ज्यानंतर तिला ब्रेकअपमधून बाहेर पडण्यास मोठा काळ लागला होता. तर विवाहासाठी सोहेल खटुरियाला होकार देण्यास 7-8 वर्षे लागल्याचे तिने सांगितले आहे.
हंसिका आणि सोहेलने 4 डिसेंबर रोजी जयपूरच्या मुंडोता किल्ल्यात विवाह केला होता. सोहेलला डेट करण्यापूर्वी हंसिकाने हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळी चित्रपटांमध्ये काम केले होते. यादरम्यान ती अनेक वर्षांपर्यंत तमिळ कलाकार सिलम्बरासन थेसिंगू राजेंद्रसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याला सिंबू किंवा एसटीआर सिंबू या नावानेही ओळखले जाते.
विवाहासाठी होकार देण्यास मला 7-8 वर्षे लागली आहेत. माझा प्रेमावर विश्वास आहे. परंतु रोमँटिक व्यक्ती म्हणून व्यक्त होणारी नाही. माझा विवाहावर विश्वास आहे. माझ्यासोबत सदैव राहणाऱया व्यक्तीलाच मी होकार देऊ इच्छित होते. सोहेलने हा विश्वास दिल्याने मी होकार दिल्याचे हंसिकाने म्हटले आहे.
प्रत्येक नाते वेगळे
सिंबूसोबतचे नाते वेगळे होते आणि ते संपुष्टात आले. सोहेलसोबतचे नाते नवीन असून याची नवी सुरुवात झाली आहे. प्रत्येक नात्यात विचार करण्याची वेगळी पद्धत असते असे माझे मानणे असल्याचे हंसिका सांगते. हंसिका यापूर्वी 2022 मध्ये ‘महा’ या तमिळ चित्रपटात दिसून आली होती.