1 जूनला अर्जेन्टिनाविरुद्ध शेवटचा सामना खेळणार
टय़ुरिन (इटली) / वृत्तसंस्था
इटली पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार जॉर्जियो शेलिनीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. दि. 1 जून रोजी वेम्बले स्टेडियमवर अर्जेन्टिनाविरुद्ध लढतीत आपण शेवटचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे त्याने जाहीर केले.
क्लब स्तरावर युवेन्ट्स संघाचे नेतृत्व सांभाळत असलेल्या शेलिनीने मागील हंगामात इटलीला युरो 2020 स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले होते. आता तो कॉन्मेबोल कोपा अमेरिका 2021 चॅम्पियन्स अर्जेन्टिनाविरुद्ध लढतीसाठी तयारी करत आहे. वास्तविक, शेलिनीला आणखी एक फिफा वर्ल्डकप खेळण्याची इच्छा होती. पण, इटलीचा संघ कतार 2022 वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवू न शकल्याने त्याचा नाईलाज झाला आणि आता त्याने वेम्बलेवरील लढतीनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी सिरी ए स्पर्धेतील साखळी सामन्यात युवेन्ट्सला सॅस्सूआलोविरुद्ध 2-1 फरकाने विजय मिळवून दिल्यानंतर शेलिनी माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने लंडनमध्ये होणाऱया आगामी लढतीसाठी उपलब्धता कळवली आणि याचवेळी आपल्यासाठी हा निरोपाचा सामना असेल, असे जाहीर केले.