वृत्तसंस्था /लंडन
2024 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत इटलीच्या लोरेंझो मुसेटीने पुरूष एकेरीत पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुसेटीने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा पराभव केला. ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत मुसेटीने पहिल्यांदाच उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. आता मुसेटी आणि सर्बियाचा जोकोविच यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल. पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या 22 वर्षीय तसेच 25 व्या मानांकित मुसेटीने टेलर फ्रिट्जचे आव्हान 3-6, 7-6 (7-5), 6-2, 3-6, 6-1 अशा पाच सेटस्मधील लढतीत संपुष्टात आणले. मुसेटीने यापूर्वी विम्बल्डन तसेच इतर प्रमुख स्पर्धांमध्ये तिसरी फेरी पार केली नव्हती. या पाच सेटस्मधील लढतीत टेलरने पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर मुसेटीने दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबवित जिंकून बरोबरी साधली.
या लढतीतील तिसरा सेट एकतर्फी झाला. मुसेटीने हा सेट 6-2 असा जिंकून फ्रिट्जवर बढत मिळविली. चौथा सेट फ्रिट्जने जिंकून बरोबरी साधल्याने सामन्याला अधिकच रंगत आली. मात्र पाचवा आणि शेवटचा सेट एकतर्फी झाला. या सेटमध्ये फ्रिट्जला केवळ एक गेम जिंकता आल्याने त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सर्बियाचा जोकोविच याने या स्पर्धेत विक्रमी 13 व्यांदा उपांत्य फेरी गाठली असून त्याने फेडररच्या विक्रमाशी बरोबरी केली. जोकोव्हिचने आतापर्यंत ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत 49 वेळा उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली आहे. तसेच त्याने ही स्पर्धा यापूर्वी सातवेळा जिंकली असून आता तो आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत विक्रमी 25 वे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी आतुरलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरला दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्धवट सोडावा लागल्याने जोकोव्हिचला उपांत्यफेरीसाठी पुढे चाल मिळाली.