Tarun Bharat

आशिया चषक पात्रतेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत चुरस

एकमेव जागेसाठी संयुक्त अरब अमिरात, हाँगकाँग, कुवेत संघात रस्सीखेच

मस्कत / वृत्तसंस्था

यंदाच्या आशिया चषक स्पर्धेतील पात्रतेसाठी संयुक्त अरब अमिरात, हाँगकाँग व कुवेत अशा तीन संघांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत चुरस रंगणार, हे निश्चित झाले. बुधवारी पात्रता फेरीच्या शेवटच्या दिवशी दोन सामने पूर्ण झाल्यानंतर अ गटात भारत, पाकिस्तान यांच्यासह तिसरा संघ कोणता असेल, हे स्पष्ट होणार होते.

यंदा पात्रता फेरीत हाँगकाँगने सिंगापूरचा 148 धावांनी धुव्वा उडवत जोरदार सुरुवात केली. एहसान खानने 20 धावात 3 बळी घेत त्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतर त्यांनी कुवेतला नमवत गुणतालिकेत अव्वलस्थान प्राप्त केले. बुधवारी सायंकाळी उशिराने होणाऱया युएईविरुद्ध लढतीत त्यांनी मोठा विजय संपादन करणे आवश्यक होते.

तत्पूर्वी, कुवेतने हाँगकाँगविरुद्ध लढतीत 9 बाद 151 धावांपर्यंत मजल मारली. यासीम मुर्तझा (46) व निझाकत खान (50) यांनी धावांचा यशस्वी पाठलाग करताना लक्षवेधी योगदान दिले होते. याशिवाय, बाबर हयातने देखील 30 चेंडूत 53 धावांची जलद खेळी साकारली. मुर्तझाने हाँगकाँगतर्फे 11 धावात 2 बळी घेण्याचा पराक्रम गाजवला. बुधवारच्या सामन्यांपूर्वी हाँगकाँगच्या खात्यावर 4 गुण होते. त्यांनी 2 सामन्यात 2 विजय नोंदवले. शिवाय, त्यांची धावसरासरी 0.716 इतकी राहिली आहे.

बुधवारच्या लढतीत हाँगकाँगला पराभव पत्करावा लागला तर त्यांचे गुण युएईइतके राहिले असते. पण, धावसरासरीच्या निकषावर त्यांना अव्वलस्थान गमवावे लागले असते. हाँगकाँगला यापूर्वी कोणत्याही अधिकृत टी-20 सामन्यात युएईला पराभूत करता आलेले नाही. यापूर्वी ऑक्टोबर 2019 मध्ये या उभय संघात टी-20 वर्ल्डकप क्वॉलिफायर झाली होती.

युएईचा संघ गुणतालिकेत एका विजय, दोन गुणांसह दुसऱया स्थानी असून त्यांची धाव सरासरी 1.045 इतकी आहे. युएईला यंदा कुवेतविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मात्र, नंतर त्यांनी सिंगापूरचा धुव्वा उडवला होता. युएईचा संघ साखळी फेरीत सर्वात अखेरीस खेळणार होता. त्यामुळे कुवेतने सिंगापूरला नमवले तरी युएईला किती फरकाने विजय मिळवत पात्र ठरता येईल, याचे गणित सामन्यापूर्वीच निश्चित असणार होते.

गुणतालिकेत कुवेतचा संघ 2 सामन्यात 1 विजय, 2 गुणांसह तिसऱया स्थानी असून पात्रतेसाठी त्यांना सिंगापूरविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय अपेक्षित होता आणि त्याचप्रमाणे युएईने किमान विजय मिळवण्याची प्रतीक्षा करावी लागणार होती. शेवटच्या साखळी सामन्यांपूर्वी त्यांची धाव सरासरी -0.421 इतकी होती.

आशिया चषक टी-20 स्पर्धेची रुपरेषा

तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण

साखळी फेरी

27 ऑगस्ट / अफगाण वि. श्रीलंका / सायं. 7.30 वा. / दुबई

28 ऑगस्ट / भारत वि. पाकिस्तान / सायं. 7.30 वा. / दुबई

30 ऑगस्ट / अफगाण वि. बांगलादेश / सायं. 7.30 वा. / शारजाह

31 ऑगस्ट / भारत वि. पात्रता संघ / सायं. 7.30 वा. / दुबई

1 सप्टेंबर / बांगलादेश वि. श्रीलंका / सायं. 7.30 वा. / दुबई

2 सप्टेंबर / पाकिस्तान वि. पात्रता संघ / सायं. 7.30 वा. / शारजाह

सुपर फोर फेरी

3 सप्टेंबर / पहिली लढत / सायं. 7.30 वा. / शारजाह

4 सप्टेंबर / दुसरी लढत / सायं. 7.30 वा. / दुबई

6 सप्टेंबर / तिसरी लढत / सायं. 7.30 वा. / दुबई

7 सप्टेंबर / चौथी लढत / सायं. 7.30 वा. / दुबई

8 सप्टेंबर / पाचवी लढत / सायं. 7.30 वा. / दुबई

9 सप्टेंबर / सहावी लढत / सायं. 7.30 वा. / दुबई

जेतेपदाची लढत

11 सप्टेंबर / फायनल / सायं. 7.30 वा. / दुबई.

गटनिहाय संघ

अ गट ः भारत, पाकिस्तान, पात्रता संघ

ब गट ः श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान

केएल राहुल पाकिस्तान संघावर तुटून पडेल ः स्कॉट स्टायरिस

भारताचा आघाडीवीर फलंदाज केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध बहुचर्चित आशिया चषक लढतीत प्रारंभीच तुटून पडेल, असा आशावाद न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने व्यक्त केला. यंदाची आशिया चषक स्पर्धा दि. 27 ऑगस्टपासून खेळवली जाणार असून भारत-पाकिस्तान हे कट्टर पारंपरिक संघ दि. 28 रोजी आमनेसामने भिडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, स्टायरिस बोलत होता.

केएल राहुलला यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतर दुखापतीला सामोरे जावे लागले असून अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत त्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन नोंदवले. भारतीय संघ यंदा आठव्यांदा आशिया चषकावर आपली मोहोर उमटवण्यासाठी उत्सुक असून त्याचे पुनरागमन संघासाठी प्रेरणादायी ठरु शकते.

‘केएल राहुल खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहिला तर त्याला बाद करणे आव्हानात्मक असेल. पण, प्रत्येक डावात सरासरी 5 ते 10 चेंडूच खेळता आले तर ही चिंतेची बाब असेल. मागील डावात त्याने 46 चेंडू खेळून काढले आणि त्यात त्याचे सर्व फटके बॅटच्या मधोमध बसणारे होते. पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच लढतीत त्याने आपल्या बॅटचे जलवे दाखवणे अपेक्षित आहे’, असे स्टायरिस याप्रसंगी म्हणाला. शाहिन आफ्रिदी दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असून केएल राहुलला याचा उत्तम लाभ घेता येईल, याचाही त्याने उल्लेख केला.

आशिया चषकासाठी भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान.

विराट कोहली म्हणाला, दडपण हाताळता येते म्हणूनच इथवर पोहोचलो!

प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममधून जावे लागत असताना त्यावर अद्याप मार्ग काढता येत नसल्याने विराट कोहलीवर सातत्याने टीका होत आली आहे. मात्र, दडपण हाताळता येते, म्हणूनच इथवर पोहोचलो आहे, असा स्पष्ट उल्लेख करत विराटने या टीकेचा प्रथमच जोरदार समाचार घेतला.

‘माझा खेळ कुठे आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची आणि दडपण हाताळण्याची हातोटी नसती तर इथवर मला पोहोचता आले नसते. पण, तरीही या संक्रमणाचा अनुभव भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त असेल’, असे कोहली याप्रसंगी म्हणाला.

तूर्तास, विराट कोहली एकाच प्रकारच्या चेंडूंना सामोरे जाताना बाद होतो, असे अजिबात आढळून येत नाही. मात्र, उसळणाऱया चेंडूंवर, स्विंग चेंडूंवर, कटर्सवर, ऑफस्पिन, लेगस्पिन, लेफ्ट-आर्म स्पिन अशा प्रत्येक प्रकारच्या चेंडूवर विराट निष्प्रभ ठरत चालला आहे, ती अधिक चिंतेची बाब ठरत आली आहे.

बॉक्स

नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटच्या शतकानंतर विराटचे प्रदर्शन

क्रिकेट प्रकार / सामने / धावा / अर्धशतके / सर्वोच्च / सरासरी

कसोटी / 18 / 872 / 6 / 79 / 27.25

वनडे / 23 / 824 / 10 / 89 / 35.82

टी-20 / 27 / 858 / 8 / 94* / 42.90.

Related Stories

झुलनची कमाल, स्मृतीची धमाल!

Patil_p

सचिनची कोरोनावर मात

Patil_p

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा प्रेक्षकांविना होणार

Patil_p

भारतीय महिला संघालाही विजयाची नितांत गरज

Patil_p

`जोकोविच अंतिम फेरीत

Patil_p

रूटच्या नाबाद अर्धशतकाने इंग्लंडला सावरले

Patil_p