प्रतिनिधी/ बेळगाव
ज्युनिअर लिडर्स विंग, बेळगाव येथील कर्मचाऱयांच्यावतीने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांसाठी क्रिकेट व धावणे तर महिलांसाठी लिंबू-चमचा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना जे. एल. विंगचे कमांडर मेजर जनरल पी. एस. बाजवा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आरएमएस ग्राऊंड येथे झालेल्या या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात कर्मचाऱयांनी सहभाग घेतला. कर्मचाऱयांना वर्षातून एकदा तरी क्रीडा स्पर्धांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात आला होता. 88 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला तर 250 हून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. संतोष गावडे यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. बक्षीस वितरणावेळी मंजुळा गुप्ता व सुप्रिया पाटील यांनी मार्गदर्शन केले.
पी.सी. विंग ठरला विजेता
यावेळी क्रिकेटचा 10 षटकांचा सामना आयोजित करण्यात आला होता. एकूण चार संघांनी यामध्ये सहभाग घेतला. कमांडो विंग, पी. सी. विंग, जे. एल. विंग अ व ब अशा चार संघांमध्ये स्पर्धा झाली. यामध्ये सागर बोंगाळे यांनी तुफान फटकेबाजी करत पी. सी. विंग संघाला विजय मिळवून दिला. सागर बेंगाळे यांना मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाजने सन्मानित करण्यात आले. आनंद तुपारे यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले.
100 मीटर धावण्याचा स्पर्धेत हणमंत एस., संदीप पी., सागर हलन्नावर, जोतिबा मिसाळ, यल्लाप्पा तलवार, भागंबर सिंग यांनी विजेतेपद पटकाविले. 50 मीटर लिंबू-चमचा स्पर्धेत सरिता पाटील प्रथम, तृप्ती नेसरकर व नमिता यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. यावेळी कमांडिंग ब्रिगेडियर सी. दयालन, ले. कर्नल श्रीनिवास के. एन. यासह इतर उपस्थित होते.