200 कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सोमवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुढील सुनावणी 22 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारच्या सुनावणीवेळी जॅकलीन न्यायालयात वकिलांच्या पेहरावात उपस्थित राहिली. आपल्याकडे कोणीही संशयाच्या नजरेने पाहू नये यासाठी तिने वकिलांचा पेहराव परिधान केल्याची चर्चा सुरू आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने 17 ऑगस्ट रोजी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात जॅकलीनचे नाव आरोपी म्हणून होते. ईडीने एप्रिलमध्ये अभिनेत्री जॅकलीनची सात कोटींहून अधिक संपत्ती जप्त केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याशी केलेल्या व्यवहारांमुळे जॅकलीन अडचणीत सापडली होती. सुकेश चंद्रशेखर हा फसवणूक करणारा असून तो पैसे उकळतो याची माहितीही सुरुवातीपासून जॅकलीनला असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. या दोघांचे अनेक खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ईडीने जॅकलीनची चौकशी केली आणि दोघांचे फोटो पुरावे म्हणून न्यायालयात सादर केले होते.