शहापूर, वडगाव, जुनेबेळगाव परिसरातील भाविकांची गर्दी : विविध ठिकाणी रथावर पुष्पवृष्टी : भाविकांना ठिकठिकाणी फळे, सरबत वितरण
प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) यांच्यावतीने रविवारी हरेकृष्ण रथयात्रा काढण्यात आली. ‘हरिबोल’च्या जयघोषाने शहापूर व गोवावेस परिसर दुमदुमून गेला होता. राधाकृष्ण, गौरनिताय या रथयात्रेत मोठय़ा संख्येने कृष्णभक्त सहभागी झाले होते. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे रथयात्रा होऊ न शकल्यामुळे यावषी मोठय़ा प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती.
इस्कॉन बेळगावचे प्रमुख भक्तिरसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्चविग्रहांचे पूजन करून यात्रेस प्रारंभ झाला. शहापूर येथील नाथ पै चौक येथून पोलिसांच्या उपस्थितीत रथयात्रा निघाली. टाळ-मृदंगाच्या गजरात हरेकृष्णच्या नामघोषात निघालेली रथयात्रा पाहण्यासाठी शहापूर, वडगाव, जुनेबेळगाव परिसरातील भाविकांची गर्दी झाली होती.
सजावट केलेला रथ, त्यावर विराजमान असलेले राधाकृष्ण व गौरनिताय यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. एका वेगळय़ा रथावर इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. सजविलेल्या बैलगाडय़ांमधून भगवंतांच्या जीवनावरील प्रसंग दाखविणारे चित्ररथ ठेवण्यात आले होते. हंदिगनूर येथील भजनी मंडळाने यामध्ये सतत नामघोष सुरू ठेवला होता. एका बाजूला महिला तर दुसऱया बाजूने पुरुष रथाचे दोरखंड ओढत होते. सर्वसामान्य नागरिकांनाही रथसेवेची संधी मिळत असल्याने चेहऱयावर आनंद होता. काही ठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. भाविकांकडून फळे, प्रसाद, पाणी, सरबत वितरित केले जात होते. रथयात्रा खडेबाजार, शहापूरमार्गे बँक ऑफ इंडिया कॉर्नर येथून महात्मा फुले रोड मार्गे गोवावेस येथे पोहोचली.
रांगोळय़ा ठरल्या लक्षवेधी…
ज्या मार्गावरून रथयात्रा जाणार होती, त्या मार्गावर मोठय़ा रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या. मंजिरी रेणके यांच्या नेतृत्त्वाखाली बेळगावमधील 20 तरुणींनी रथयात्रा मार्गावर रांगोळय़ा रेखाटल्या. या रांगोळय़ा लक्षवेधी ठरल्या. संपूर्ण रथयात्रा मार्गावर भाविकांना प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली. पावसामुळे यावषी रथयात्रा सकाळी काढण्यात आली. त्याचप्रमाणे मंदिराच्या पाठीमागे उभारलेल्या मंडपातील कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र, मंदिरात सायंकाळी सर्व कार्यक्रम पार पडले.