विविध गावांमध्ये सामूहिक पद्धतीने पडल्या भरण्याचा कार्यक्रम : विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन : भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ
वार्ताहर /किणये
उदं गं आई उदं… असे म्हणत, भंडाऱ्याच्या उधळणीत तालुक्यात मंगळवारी यल्लम्मा देवीचा जागर करण्यात आला. गावोगावी सामूहिक पद्धतीने पडल्या भरण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. बहुतांशी ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्याच्या अनेक गावातील भाविक शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यल्लम्मा डोंगरावर गेले होते. सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर पडल्या भरण्याचा कार्यक्रम झाला. चार दिवस यल्लम्मा डोंगरावर अनेक गावातील भाविकांनी वास्तव्य केले होते. यातील बरेच भाविक सोमवारी सकाळी व काही ठिकाणी रात्री आपापल्या गावी परत आले होते.
यल्लम्मा सौंदत्ती यल्लमा डोंगरावर जाऊन आल्यानंतर घरी येण्याच्या आधी सामूहिक पद्धतीने पडल्या भरण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही जपण्यात आली आहे.
ज्या ज्या गावातून भाविक यल्लम्मा डोंगराला गेले होते. त्या त्या गावच्या भाविकांनी गावच्या बाहेरच सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक असा मंडप सजावट केला होता. महिलांनी आपापल्या पडल्या एकत्रित आणल्या. त्यानंतर सामूहिक पद्धतीने व गावच्या परंपरेनुसार पडल्यांची पूजाअर्चा करण्यात आली.
ज्या भाविकांना सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या यात्रेला जाता आले नाही. अशा भाविकांनी आपापल्या गावातील या यात्रेला आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. यावेळी भंडाऱ्याची उधळण करीत यल्लम्मा देवीचा जयघोष करण्यात आला.
गावागावांमधील सर्व देवतांची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर उदं..उदं… असे म्हणून महिलांनी विधिवत पूजा केली. गावागावांमधील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
खादरवाडी, मच्छे, बहाद्दरवाडी, कर्ले, नावगे, बेळगुंदी आदींसह तालुक्याच्या विविध गावांमध्ये ही यल्लम्मा देवीची यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त विविध खेळणी, आईक्रीम व इतर स्टॉल्सही लावण्यात आले होते. याचा बालचमुनी आनंद घेतला.
धामणे येथे नवगोबा यात्रा उत्साहात
धामणे येथे नवगोबा यात्रा मंगळवार दि. 10 रोजी येथील बनकुडी तलावाशेजारी गावातील देवस्थान पंचकमिटीच्या उपस्थितीत उदो गे आई उदो..च्या जयघोषात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत उत्साही वातावरणात पार पडली.
प्रतिवर्षाप्रमाणे शाकंभरी पौर्णिमेला यल्लम्माला जाऊन येऊन प्रथेप्रमाणे दि. 10 रोजी नवगोबा यात्रा पार पडली. दुपारी 1 वाजता धामणे गावचे यल्लम्मा देवीचे पुजारी मोनाप्पा व्हनुले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व पडल्या एकत्र भरून विधीवत पूजन करण्यात येऊन उतकार घालण्यात आले. त्यानंतर श्रीफळ फोडण्यात येऊन भंडाऱ्याची उधळण उपस्थित भाविकांच्यावतीने करण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानी पंच श्रीकांत डुकरे, बाबा पाटील, महादेव चौगुले, जोतिबा धर्मूचे, विनोद अकणोजी, अशाक कामशेट्टी, बाळू बेळगावकर आणि आजी-माजी ग्रा. पं. सदस्य, धामणे व ब्रह्मलिंगहट्टी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देसूर येथे यल्लम्मादेवी नवगोबाची यात्रा साजरी
धामणे : देसूर येथे यल्लम्मादेवी नवगोबाची यात्रा दि. 10 रोजी छत्रपती श्री शिवाजी चौकात उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही देसूर येथील भाविकांनी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर दि. 6 रोजी शाकंभरी पौर्णिमेदिवशी पडल्या भरण्याचा कार्यक्रम विधीवत करण्यात आला. त्याचप्रमाणे परंपरेप्रमाणे गावात नवगोबाची यात्रा मंगळवारी दुपारी छ. शिवाजी चौकात आयोजित करण्यात येऊन एक वा. यल्लम्मा देवीचे पुजारी आपुराव पाटील आणि आप्पा गुरव व चंदू कोलकाता, त्याचप्रमाणे यात्रा कमिटीचे अध्यक्ष दशरथ वसुलकर व कमिटीचे सदस्य अनिल पाटील, शांताराम लक्केबैलकर, शिवाजी पाटील, ग्रा. पं. सदस्य सतीश चव्हाण, संतोष मरगाळे, पंकज घाडी आणि गावातील भाविक व महिला भक्त यांच्या उपस्थितीत पडल्या भरण्यात येऊन यल्लम्मा देवीच्या जगाचे पूजन करण्यात येऊन उतकार घालण्यात आले. त्यानंतर प्रसाद करण्यात आला. संध्याकाळी गावात भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
राजहंसगड मळ्यातील यात्रा साजरी
धामणे : राजहंसगड येथे यल्लम्मा देवीची मळ्यातील यात्रा भक्तीमय वातावरणात मंगळवारी पार पडली. प्रथेप्रमाणे राजहंसगड गावच्या शेजारी असलेल्या तलावाच्या बाजूला ही यात्रा होते. यल्लम्मा देवीचे दर्शन घेवून सौंदत्ती येथून येऊन रविवारी आणि सोमवारी भाविकांनी येथे मुक्काम केला होता. मंगळवारी या मळ्यातील यात्रेला सुरुवात सकाळी 11.30 वा. भाकरीच्या पडल्या भरुन झाली. त्यानंतर दुपारी 4 वा.गावातील देवस्थान पंचकमिटी व गावकमिटीच्या उपस्थितीत पडल्या भरण्यात येवून यल्लम्मा देवीच्या जगचे विधीवत पूजन करण्यात आले. भंडाऱ्याच्या उधळणीनंतर प्रसाद वाटप करण्यात येऊन यात्रेची सांगता झाली. याप्रसंगी देवस्थान पंचकमिटीचे सदस्य, ग्रा.पं. आजी-माजी सदस्य व महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कडोली येथे पडल्या भरण्याचा कार्यक्रम
कडोली कडोली येथील आमराईत श्री यल्लम्मा देवीच्या पडल्या भरण्याचा कार्यक्रम (मारग मळणी जत्रा) मोठ्या उत्साहात पार पडला. येथील श्री यल्लम्मादेवीचे भक्त मोठ्या संख्येने सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या यात्रोत्सवात गेले होते. ते सर्व भक्त परत आल्यानंतर देवस्थान पंचकमिटी, हक्कदार यांच्या विद्यमाने आमराईतील देवीच्या गदगेसमोर धार्मिक पद्धतीने श्री रेणुका देवीच्या पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रेला गावातील हजारो भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती. शेवटी महाप्रसादाचे वाटप होऊन यात्रेची सांगता झाली.
उदं गं आई उदं..च्या गजरात येळ्ळूरमध्ये यात्रा
सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावर भाविक जाऊन आल्यानंतर गावाच्या बाहेरच पडल्या भरण्याचा कार्यक्रम दरवर्षी करत असतात. कोरोनामुळे दोन वर्षे भाविक यल्लम्मा डोंगराला गेले नव्हते. मात्र यावर्षी मोठ्या संख्येने भाविक यल्लम्मा डोंगराला गेले होते. तेथे पडल्या भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर येळ्ळूर गावी परतले होते. मंगळवारी गावच्या बाहेरच मळ्यामध्ये पडल्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
गेल्या दोन दिवसांपासून भाविक हणमंतगौंडनगर येथे येवून राहत होते. मंगळवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाप्रसादही झाला. यल्लम्मा डोंगराला जाणारे भाविक मळ्यामध्ये महाप्रसाद करतात. आपल्या नातेवाईकांना बोलावून महाप्रसाद त्यांना देतात. महाप्रसाद झाल्यानंतर महिला पडल्या घेवूनच आपल्या घरी जातात. जाताना वाचतगाजत त्यांना गावात नेले जाते. यावेळी उदं गं आई उदं.. असा जयघोष ते करत होते. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीनेही विजेची व इतर सोय केली होती. हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.