भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. दिल्लीत झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी धनखड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटींमध्ये उपराष्ट्रपतीपद उमेदवारीबाबत चर्चा झाली होती.
विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. देशाचा पुढील उपराष्ट्रपती निवडण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणीही होणार असून नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींची घोषणा केली जाईल. उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यास मतदानाची गरज भासणार नाही.
राजस्थानमधील जाट समुदायाचे नेते
जगदीप धनखड हे राजस्थानमधील जाट नेते आहेत. 70 वषीय जगदीप धनखड यांची जुलै 2019 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बंगालचे 28 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती. या नियुक्तीपासून त्यांचा राज्यात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसशी संघर्ष सुरू होता. हा संघर्ष वाढल्यानंतर गेल्यावषी डिसेंबरमध्ये टीएमसीच्या 5 सदस्यीय शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन राज्यपाल धनखड यांना हटवण्याची शिफारस केली होती. मात्र, त्यांना हटवण्यात आले नव्हते. राजकीय पटलावर 1989 ते 1991 या काळात राजस्थानच्या झुंझुनू येथून लोकसभेचे खासदार म्हणून ते कार्यरत होते. चंद्रशेखर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होते. 1993 ते 1998 या काळात त्यांनी राजस्थानमधील किशनगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले होते.
नक्वी यांच्यावर आता कोणती जबाबदारी?
उपराष्ट्रपती पदासाठी माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांच्याऐवजी जगदीप धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आता नक्वी यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपविली जाते? याबाबत उत्सुकता आहे. 6 जुलै रोजी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गुरुवारी, 7 जुलै रोजी संपत होता. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने नक्वी यांना उमेदवारी दिली नव्हती. तेव्हापासून पक्ष त्यांना मोठय़ा भूमिकेत आणू इच्छित असल्याची चर्चा होती.